बाळासाहेब तुम्हीच हवे होता - उद्धव ठाकरे

By Admin | Published: November 17, 2016 08:11 AM2016-11-17T08:11:06+5:302016-11-17T08:11:06+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देताना नोटबंदीच्या निर्णयावरुन नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकेचे आसूड ओढले आहेत.

Balasaheb wanted you - Uddhav Thackeray | बाळासाहेब तुम्हीच हवे होता - उद्धव ठाकरे

बाळासाहेब तुम्हीच हवे होता - उद्धव ठाकरे

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १७ - दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज चौथा स्मृतीदिन असून, त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देताना नोटबंदीच्या निर्णयावरुन नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकेचे आसूड ओढले आहेत. 
 
शाई लावलेली बोटे खिशात लपवून लोक निराश मनाने जगत आहेत. हे नैराश्य म्हणजेच देशभक्ती असे कुणाला वाटत असेल तर असे बोलून देशभक्तांचा अपमान करणार्‍यांच्या जिभा हासडून काढायला बाळासाहेब तुम्हीच हवे होता. १२५ कोटी लोकांच्या जीवनाचा सांगाडा झाला आहे. लोकांची मनेही विझून गेल्यासारखी दिसतात. या विझलेल्या मनावरील राखेवर फुंकर मारून निखारे धगधगत ठेवायला बाळासाहेब तुम्हीच हवे आहात असे सामनाच्या आजच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 
 
शिवसेनाप्रमुखांचे स्मरण हिंदुस्थानची जनता करीत आहे व आज शिवसेनाप्रमुख असायलाच हवे होते, असे सांगणे हा देशातील सर्व राजकीय पुढार्‍यांचा पराभव आहे. जनता त्रासली आहे. सरकारने आपल्याच मायबाप जनतेला भिकारी बनवून रस्त्यावर उभे केले. रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता. तसे जनतेला भिकारी, कंगाल बनवून ‘यालाच देशभक्ती म्हणतात बरं का?’ असे तोंडाचे डबडे वाजवणार्‍यांचे मुस्काट फोडून जनतेच्या आक्रोशाचे लाऊडस्पीकर होणारे शिवसेनाप्रमुख आज हवे होते ही जनतेची भावना आहे असे आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात 
- देशाची सवाशे कोटी जनता रांगेत उभी राहून तडफडत आहे. या सवाशे कोटी जनतेचा एकच बुलंद आवाज आहे, ‘‘बाळासाहेब, परत या. जनता त्रासात आहे. साहेब, आज तुम्ही असायला हवे होता.’’ शिवसेनाप्रमुखांचे स्मरण हिंदुस्थानची जनता करीत आहे व आज शिवसेनाप्रमुख असायलाच हवे होते, असे सांगणे हा देशातील सर्व राजकीय पुढार्‍यांचा पराभव आहे. जनता त्रासली आहे. सरकारने आपल्याच मायबाप जनतेला भिकारी बनवून रस्त्यावर उभे केले. रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता. तसे जनतेला भिकारी, कंगाल बनवून ‘यालाच देशभक्ती म्हणतात बरं का?’ असे तोंडाचे डबडे वाजवणार्‍यांचे मुस्काट फोडून जनतेच्या आक्रोशाचे लाऊडस्पीकर होणारे शिवसेनाप्रमुख आज हवे होते ही जनतेची भावना आहे. देशात नेत्यांची संख्या कमी नाही. 
 
- गल्लीतल्या एका झाडावर दगड मारला तर पंचवीस बिनकामाचे पुढारी खाली पडतील. पण यातील एक तरी पुढारी जनतेच्या कामाचा राहिला आहे काय? एक तरी पुढारी जनतेच्या मनातील संतापाचा वणवा पेटवण्यासाठी स्वत: त्या वडवानलात घुसून जळायला तयार आहे काय? सरकारच्या मोहम्मदी कारभाराची किंमत सवाशे कोटी जनता भोगत आहे. ५००-१००० च्या नोटा रद्द करून जनतेला भुकेकंगाल करणे हे जालियनवाला बागेपेक्षाही भयंकर आहे. या परिस्थितीशी टक्कर देणारे नेतृत्व आज कुठे दिसत नाही. सर्वत्र अंधार आहे व त्या अंधारातून जनतेचा आक्रोश कानात घुमत आहे. ‘‘बाळासाहेब परत या. बाळासाहेब, आज तुम्ही असायला हवे होता!’’ 
 
- देशाला खवळून उभे करण्याची ताकद आज कुणामध्ये आहे? शिवसेनाप्रमुखांसारख्या पुढार्‍यांचे तप उग्र असते. त्यांचा मार्ग इतरांहून भिन्न असतो. कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची त्यांची शक्ती इतर लेच्यापेच्यांच्या शक्तीवर आजमावून पाहणे चुकीचे आहे. राष्ट्रात जे मोठमोठे पुरुष होतात ते परिस्थितीपुढे कधीच गुडघे टेकत नाहीत. ते लोककल्याणाचे व लढ्याचे नवीन मार्ग शोधून काढतात व संकटाला नमवतात. अशा श्रेष्ठ पुरुषांच्या यादीत शिवसेनाप्रमुखांचे नाव सदैव तेजाने तळपत राहील. प्रश्‍न कश्मीरचा असो, दहशतवादाचा असो, घुसखोरीचा असो, महागाई किंवा काळ्या पैशांचा असो. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी नेहमीच मरगळलेला देश लढण्यासाठी तयार केला. 
 
- आज गतीपेक्षा अधोगतीच जास्त आहे. गतीला गती येण्यापेक्षा अधोगतीलाच गती आली आहे. उरीच्या भयंकर पाक हल्ल्यानंतर सरकारने पाकव्याप्त कश्मीरात सर्जिकल स्ट्राइक नावाचा प्रकार केला. पण त्याने खरेच पाकिस्तानला अद्दल घडली आहे काय? आजही पाकिस्तानचे हल्ले सुरूच आहेत व आमचे दोन-चार जवान रोज शहीद होत आहेत. शिवसेनाप्रमुख नेहमी तळमळीने सांगायचे, ‘‘देशाला एका लोहपुरुषाची आवश्यकता आहे. 
 
- एक जबरदस्त लोहपुरुष दिल्लीत बसल्याशिवाय देश सुधारणार नाही. हा लोहपुरुष लोकांनीच शोधायचा आहे!’’ शिवसेनाप्रमुखांचे विचार स्पष्ट होते. ते स्वत: हजार लोहपुरुषांच्या शक्तीचे होते, पण सत्तेचा मोह त्यांनी ठेवला नाही. राष्ट्रहित व लोकहितासाठी त्यांनी आयुष्याचे समर्पण केले. त्यांनी शूर, वीर, लोहपुरुष घडवले. पण शेवटी या लोहपुरुषांनी १२५ कोटी जनतेला पंधरा दिवस भिकारी बनवून रांगेत उभे केले व पुढचे चार-पाच महिने देश रांगेत व ‘रांगत’ राहील. म्हणूनच ही रांगेतली रांगणारी जनता सांगत आहे, ‘‘बाळासाहेब, आज तुम्ही हवे होता!’’ 
 
- निवडणुका नसतानाही लोकांच्या बोटांना ‘शाई’ लावून रांगेत उभे करणे हा राष्ट्रीय अपराध आहे. शाई लावलेली बोटे खिशात लपवून लोक निराश मनाने जगत आहेत. हे नैराश्य म्हणजेच देशभक्ती असे कुणाला वाटत असेल तर असे बोलून देशभक्तांचा अपमान करणार्‍यांच्या जिभा हासडून काढायला बाळासाहेब तुम्हीच हवे होता. १२५ कोटी लोकांच्या जीवनाचा सांगाडा झाला आहे. बाजार बंद, कारखाने बंद, रोजगार बंद. चुली विझल्या. पण लोकांची मनेही विझून गेल्यासारखी दिसतात. या विझलेल्या मनावरील राखेवर फुंकर मारून निखारे धगधगत ठेवायला बाळासाहेब तुम्हीच हवे आहात. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी १२५ कोटी जनतेची हीच मानवंदना आहे. 

Web Title: Balasaheb wanted you - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.