जुना ढोकळा नव्याने गरम करून वाढलाय, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

By admin | Published: January 2, 2017 07:58 AM2017-01-02T07:58:45+5:302017-01-02T07:58:45+5:30

पंतप्रधानांनी ज्या घोषणांची आतषबाजी केली त्यापैकी अनेक घोषणा जुन्याच आहेत व ‘यूपीए’ सरकारच्या काळापासून चालू आहेत अशीही टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे

Old Dokalas have increased by heating, Uddhav Thackeray criticizes Modi | जुना ढोकळा नव्याने गरम करून वाढलाय, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

जुना ढोकळा नव्याने गरम करून वाढलाय, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - पंतप्रधानांनी ज्या घोषणांची आतषबाजी केली त्यापैकी अनेक घोषणा जुन्याच आहेत व ‘यूपीए’ सरकारच्या काळापासून चालू आहेत अशीही टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. आताच्या घोषणेत नवीन काय? ढोकळा जुनाच आहे, तो नव्याने गरम करून वाढलाय किंवा ढोकळा जुनाच, पण चटणी नवीन किंवा शिल्लक कांदाभजी नव्याने तळून ‘गरम’ म्हणून विकणे अशातला हा प्रकार आहे. मात्र असे शिळे, तळकट, तुपकट खाणे हे आरोग्यास शेवटी हानीकारकच ठरते. अ‍ॅसिडीटी, घसा खवखवणे, अपचन, हृदयाच्या रक्तवाहिन्यांत दोष व शेवटी झटक्याने मृत्यू संभवतो. हे असे झटके सध्या रोज पडत आहेत व माणसे मरणाच्या दारात ढकलली जात आहेत असा टोला उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे.
 
मोदी हे आभाराचे भाषण हसतमुखाने करीत असताना बाराबंकी येथील बडागावात राहणार्‍या छोटूलाल या मुलाला आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही बँकेने पैसे दिले नाहीत. छोटूलाल हा जिवंतपणीच मेला व चारशेच्या वर लोक प्रत्यक्ष बँकांच्या रांगेत मरण पावले. त्यामुळे पंतप्रधानांनी ज्या नवीन घोषणांचा पाऊस पाडला तो अशा छोटूलालसाठी उपयोगाचा नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर आमचा लोभ आहे व राहणारच, पण देशातील आर्थिक अराजक मानवी संहारास आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मोदी हे भाषणात घोषणा करतात की धमक्या देतात अशी चिंता सगळ्यांना लागून राहिली होती. पण डोक्याला ताप नको व नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येस काही अशुभ कानी पडू नये म्हणून लोकांनी आपापल्यापरीने नवीन वर्ष आगमनाचा आनंद काटकसरीने साजरा केला. अर्थात मोदी यांच्या भाषणात तसे भीतीचे व चिंतेचे काहीच नव्हते. मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा भार हलका केला. वृत्तवाहिन्यांवरून एकप्रकारे अर्थसंकल्पातील घोषणांचा पाऊस मोदी यांनी आधीच पाडल्याने जेटली यांचे काम सोपे करून टाकले आहे. आता फेब्रुवारी महिन्यात सादर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री नवे काय करणार हा प्रश्‍नच आहे अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला चूड लावली असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेचे, मोलमजुरी करून जगणार्‍यांचे कंबरडे मोडले. आज पन्नास दिवसांनंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. लोकांच्या यातनांवर मोदी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फुंकर घालतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी फार गांभीर्याने भाषण केल्याचे दिसले नाही. जे रांगेत मेले व जे आजही तडफडत आहेत त्यांचे आभार मानून मोदी यांनी नव्या घोषणांची छत्री हलवली आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मुळात लोकांना मोदी यांच्याकडून वेगळ्याच अपेक्षा होत्या. ‘नोटाबंदी’मुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेला दिलासा कधी मिळेल याचे ठाम उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही. कारण त्यांच्याकडे बहुधा उत्तरच नसावे. दुसरे असे की, नोटाबंदीनंतर किती काळा पैसा वसूल झाला याचा आकडाही पंतप्रधानांकडे नाही. मग लोकांचे इतके निर्घृण हाल का केले ते सांगावे व नव्या वर्षात तुम्हाला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवेत ते जाहीर करावे असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 

Web Title: Old Dokalas have increased by heating, Uddhav Thackeray criticizes Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.