जवान शहीद होताना पर्रीकर गोव्यात तिकीट वाटपात मग्न - शिवसेना

By admin | Published: January 10, 2017 01:35 PM2017-01-10T13:35:12+5:302017-01-10T13:44:56+5:30

देशाचे जवान काश्मीरमध्ये शहीद होत असताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर मात्र गोव्यात तिकीट वाटप करण्यात मग्न आहेत अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

Parrikar divorces ticket in Goa after martyr's death - Shiv Sena | जवान शहीद होताना पर्रीकर गोव्यात तिकीट वाटपात मग्न - शिवसेना

जवान शहीद होताना पर्रीकर गोव्यात तिकीट वाटपात मग्न - शिवसेना

Next

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 10 -  देशाचे जवान काश्मीरमध्ये शहीद होत असताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर मात्र गोव्यातील भाजपाच्या कार्यालयात बसून विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप करण्यात मग्न आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पणजीमध्ये केली.
 
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, पर्रीकर यांनी राजकारण नव्हे तर राष्ट्रकारण करायला हवे. सीमेवर जवान शहीद होत असताना पर्रीकर गोव्यात बसून राजकारण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घ्यावी. आपण देशाचे संरक्षण मंत्री म्हणून ज्या व्यक्तीची नेमणूक केली ती व्यक्ती देशाच्या विविध भागांमध्ये ज्या ज्या वेळी अतिरेकी हल्ले झाले त्यावेळी कुठे होती हे पंतप्रधानांनी पहायला हवे.
 
राऊत म्हणाले, की वास्तविक पर्रीकर यांनी पणजीत नव्हे तर काश्मिरमध्ये जायला हवे. त्यांनी मणिपुर व नागालँडमध्ये जायला हवे. काश्मीरमध्ये हल्ले सुरू असताना पर्रीकर यांनी पणजीत बसून तिकीट वाटपात मग्न होणे हे देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने चिंताजनक आहे. दरवेळी पर्रीकर गोव्यातच असतात.
 
येत्या 4 फेब्रुवारी रोजी गोव्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी आणि प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचशी शिवसेनेची युती झालेली आहे. गोव्यात पुढील सरकार युतीचे येईल आणि शिवसेना गोव्यातही सत्तेत असेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
 
आम्ही यापूर्वी महाराष्ट्रात भाजपशी युती केली व पंचवीस वर्षे ती युती टीकवली. वाजपेयी, अडवाणी, स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मिळून देशाच्या व हिंदुत्वाच्या हितासाठी ती युती केली होती पण भाजपने मध्यंतरी ती युती तोडली. गोव्यात मात्र महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी व वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचशी आमची युती तुटणार नाही.
 
महाराष्ट्रात गेली पन्नास वर्षे जे काम शिवसेना करत आहे, तेच काम गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष करत आहे, असे राऊत म्हणाले.यावेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार सुदिन ढवळीकर तसेच प्रा. सुभाष वेलिंगकर आदी नेते उपस्थित होते.
(खास प्रतिनिधी)                  

Web Title: Parrikar divorces ticket in Goa after martyr's death - Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.