लालबाग फ्लायओव्हर; दुरुस्तीला स्थगिती
By admin | Published: January 11, 2017 04:50 AM2017-01-11T04:50:28+5:302017-01-11T04:50:40+5:30
स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतरच लालबागच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करा, असा स्पष्ट आदेश असतानाही मुंबई महापालिकेने आॅडिट न करताच पुलाच्या
मुंबई : स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतरच लालबागच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करा, असा स्पष्ट आदेश असतानाही मुंबई महापालिकेने आॅडिट न करताच पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. महापालिकेच्या या मनमानी कारभारावर लगाम बसवत उच्च न्यायालयाने मंगळवारी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली.
सध्या या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे. मात्र यापूर्वीच उच्च न्यायालयाने महापालिकेला उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घ्या, असा आदेश दिला होता. परंतु महापालिकेने या आदेशाकडे दुर्लक्ष करत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याचा आरोप भगवान रयानी यांनी याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.
‘उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट केले असून ३१ जानेवारी रोजी हा अहवाल महापालिकेपुढे सादर करण्यात येईल,’ अशी माहिती महापालिकेच्या वकील गीता जोगळेकर यांनी खंडपीठाला दिली. ‘स्ट्रक्चर आॅडिटचा अहवाल प्रलंबित असेपर्यंत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे कामकाज हाती घेऊ नये. यासंदर्भात स्थायी समितीने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करू नये,’ असे निर्देश खंडपीठाने महापालिकेला दिले. (प्रतिनिधी)