मा.गो.वैद्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देता येईल काय?, उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला

By admin | Published: January 16, 2017 07:10 AM2017-01-16T07:10:13+5:302017-01-16T07:26:49+5:30

संघ परिवाराचे वडीलधारे श्री. मा. गो. वैद्य यांचे म्हणणे आहे की, चार मराठी भाषिक राज्ये होऊ शकतात व त्यासाठी आंदोलन वगैरे करण्याची गरज नाही.

Can the 'Maharashtra Bhushan' be given to the teachers ?, the corrupt group of Uddhav Thackeray | मा.गो.वैद्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देता येईल काय?, उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला

मा.गो.वैद्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देता येईल काय?, उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मा. गो. वैद्य यांनी पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीचा उल्लेख केला आहे. यावरून सामना संपादकीयमधून मा.गो.वैद्य यांचा चांगला समाचार घेण्यात आला आहे. नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान  'महाराष्ट्राची चार राज्ये करण्यात यावी', असे सांगत मा.गो.वैद्य यांनी पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. 'आपल्या देशात राज्यांमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड असमानता असल्याचे दिसून येते. त्यामुळेच 3 कोटींच्या लोकसंख्येप्रमाणे राज्यांची निर्मिती करायला हवी. यामुळे सुलभ राज्यप्रशासन होऊ शकते. या हिशेबाने महाराष्ट्रातून विदर्भासह 4 स्वतंत्र राज्य निर्माण होऊ शकतात', असे प्रतिपादन संघाचे ज्येष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी केले.
 
मा.गो.वैद्यांच्या विधानावर सामना संपादकीयमधून उपरोधिक टोला हाणण्यात आला आहे. 'एक अखंड मराठी राज्य निर्माण करताना महाराष्ट्राला काही वर्षे लढा द्यावा लागला. 105 हुतात्मे वेदीवर चढवावे लागले, पण श्री. मा. गो. वैद्य यांनी नागपूरच्या एका सभेत बोलता बोलता चार मराठी राज्यांची निर्मिती करून टाकली. वैद्य हे नागपूरकर आहेत. त्यांची भूमिका मराठी हिताची आहे. वैद्य यांना मुंबईत आमंत्रित करून त्यांचे जंगी सत्कार करायलाच हवेत. इतके महान विचार मांडल्याबद्दल वैद्य यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देता येईल काय? मुख्यमंत्री फडणवीस हे कराच!', अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. 

 
 
काय म्हणण्यात आले आहे सामना संपादकीयमध्ये
 
संघ परिवाराचे वडीलधारे श्री. मा. गो. वैद्य यांचे म्हणणे आहे की, चार मराठी भाषिक राज्ये होऊ शकतात व त्यासाठी आंदोलन वगैरे करण्याची गरज नाही. ‘मा. गो.’ यांच्या तोंडात साखर पडो. ईश्वर त्यांना उदंड दीर्घायुष्य देवो. ‘मा. गो.’ यांच्या दुश्मनांचे तळपट होवो. वैद्य यांनी त्यांची भूमिका नागपुरात मांडली. त्यामुळे काही नतद्रष्ट ‘‘वैद्य यांनी वेगळ्या विदर्भ राज्याची पुडी पुन्हा सोडली’’ असे बोलू शकतात, पण असे बोलणे हा वैद्य यांच्या बोलण्याचा विपर्यास ठरेल. ‘मी विदर्भवादीच आहे व छोट्या राज्यांची निर्मिती झालीच पाहिजे असे ते म्हणाले असतीलही.’ ती त्यांची भूमिका आहेच व लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याची मुभा आहे. हिंदुस्थानात राहून काही मंडळींना पाकप्रेमाच्या उकळ्या फुटतातच ना? पण त्यांचे कोणी काही वाकडे केले आहे काय? वैद्य यांच्या दृष्टीने चार मराठी राज्यांची निर्मिती हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. श्री. वैद्य चार मराठी भाषिक राज्यांचा खुंटा पुन्हा हलवून बळकट करतात. म्हणजे त्यांच्या डोक्यात या चार वेगळ्या राज्यांचा नकाशा पिंगा घालत असावा. श्री. वैद्य म्हणतात त्याप्रमाणे चार मराठी राज्ये होऊ शकतात. इतिहासात पेशव्यांनी मराठा साम्राज्याचे झेंडे ‘अटके’पार लावलेच होते.
 
अफगाणिस्तानात कंदहारपर्यंत पेशव्यांनी विजयी धडक मारली होती. उत्तर हिंदुस्थानात लखनौ, इंदूर, ग्वाल्हेर ही राज्ये मराठा साम्राज्याचाच भाग होती. तिथे आजही मराठी भाषिकांचा बोलबाला आहे. स्वतः सुमित्रा महाजन या लोकसभा ‘स्पीकर’ भाजपच्या नेत्या आहेत. त्या इंदूरमधून निवडून येतात. तेथे होळकरांचे राज्य होतेच. ग्वाल्हेरात शिंदे सरकारांचे मराठा राज्य आहे. पुन्हा धार, देवास या संस्थानांतील सरदार पवार वगैरे मंडळी मराठीच होती व आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे मिळून एक मराठी राज्य होऊ शकेल. दुसरे मराठी राज्य होऊ शकेल ते म्हणजे आपल्या सीमावर्ती भागाचे. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी असा मोठा मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकी टाचेखाली चिरडला जात आहे व गेल्या साठेक वर्षांपासून येथील मराठी जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करीत आहे. तेथील लोक त्यासाठी रक्त सांडतात, बलिदान देतात, तुरुंगात जातात. याप्रश्नी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकतात. म्हणजे सीमा भागातील मराठी माणसाने सर्व अग्निपरीक्षा पार केल्या आहेत, पण त्यांना महाराष्ट्रात टाकले जात नाही.
 
त्यामुळे या संपूर्ण भागाचे एक छोटे केंद्रशासित राज्य करायला हरकत नाही. किंबहुना सर्वोच्च न्यायालयात या वादाचा निकाल लागेपर्यंत हा संपूर्ण भाग केंद्रशासित करा ही आमची जुनीच भूमिका आहे. तेव्हा श्री. वैद्य यांच्या डोक्यातले हे दुसरे मराठी राज्य असेल तर त्या राज्याचे स्वागत! त्यासाठी त्यांचे आम्ही आजच अभिनंदन करीत आहोत व या राज्याचा मंगल कलश श्री. वैद्य दिल्लीहून घेऊन येणार असतील तर अखंड महाराष्ट्राची जनता त्यांचे साग्रसंगीत पाद्यपूजन करायला मागेपुढे पाहणार नाही. महाराष्ट्राचे मन मोठे आहे. वैद्य यांनी अशा प्रकारे दोन राज्यांची मुहूर्तमेढ रोवल्यावर तिसरे राज्य कोणते, असा प्रश्न वैद्य यांच्या आसपासच्या परिवारास पडला असेल, पण त्यांनी खराखरा डोके खाजवायची गरज नाही. वैद्य हे जुनेजाणते संघ पुढारी आहेत. ते उगाच शब्दांचे बुडबुडे फोडणार नाहीत. त्यांच्या डोक्यातले तिसरे राज्य हे बहुधा गुजरात प्रांतात घडत असावे. गुजरातेत मराठी भाषिकांची कमतरता नाहीच. खुद्द सयाजीराव गायकवाडांचे बडोदा हे राज्य 
मराठा साम्राज्याचाच
भाग. सुरतचे खासदार पाटील हे मराठी भाषिक. महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील डांग-उंबरगाव हे भाग आदिवासी असले तरी येथील आदिवासी हे मराठीतच बोलतात व राज्य पुनर्रचनेत हा डांग-उंबरगाव महाराष्ट्रात यावा असेच मत होते. ते झाले नाही. ही चूक श्री. वैद्य आता सुधारू इच्छित आहेत व हे तिसरे राज्य ‘बडोदा’ केंद्रस्थानी ठेवून असावे असे विचार श्री. वैद्य यांच्या डोक्यात घोळत असावेत. छोटी राज्ये हवीत असे वैद्य यांना वाटते व अनेक छोटय़ा राज्यांत त्यांना मराठी राज्यांचा पाळणा हलताना दिसत आहे. खरे तर श्री. वैद्य यांच्याविषयी मधल्या काळात अकारण गैरसमज झाले. ते गैरसमज आता दूर झाले. एक अखंड मराठी राज्य निर्माण करताना महाराष्ट्राला काही वर्षे लढा द्यावा लागला. 105 हुतात्मे वेदीवर चढवावे लागले, पण श्री. मा. गो. वैद्य यांनी नागपूरच्या एका सभेत बोलता बोलता चार मराठी राज्यांची निर्मिती करून टाकली. वैद्य हे नागपूरकर आहेत. त्यांची भूमिका मराठी हिताची आहे. वैद्य यांना मुंबईत आमंत्रित करून त्यांचे जंगी सत्कार करायलाच हवेत.
 
इतके महान विचार मांडल्याबद्दल वैद्य यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देता येईल काय? मुख्यमंत्री फडणवीस हे कराच!
ता. क. – अर्थात चार मराठी राज्ये व्हावीत ही कल्पना श्री. वैद्य यांची. आम्ही फक्त वैद्य गुरुजींच्या भूमिकेची ‘री’ ओढली. मात्र त्यांच्या ‘कल्पने’तील जी मराठी राज्ये आहेत त्यासाठी सध्याची कोणतीही राज्ये मोडू नयेत. शेवटी गुजरात, मध्य प्रदेशसारखी राज्ये ही महाराष्ट्राची भावंडेच आहेत. या राज्यांना नख लावून आता काय मिळणार? स्वातंत्र्यानंतर जी काही भाषावार प्रांतरचना झाली ती बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्रावर अन्याय करणारीच ठरली. बेळगावचा मुद्दा तर संवेदनशील आहेच आणि हा संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्राचाच हिस्सा आहे. तो केंद्रशासित करता येऊ शकतो. दुस-यांचे मोडून महाराष्ट्राला काही नको. तरीही वैद्य गुरुजी बोलले. आम्ही त्यांना टाळी दिली इतकेच.

Web Title: Can the 'Maharashtra Bhushan' be given to the teachers ?, the corrupt group of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.