खासगी समस्या फेसबूकवर शेअर करणा-या पत्नीची पतीने केली हत्या
By Admin | Published: January 19, 2017 09:40 AM2017-01-19T09:40:15+5:302017-01-19T14:25:11+5:30
घरगुती समस्या फेसबूक, व्हॉट्सअॅपद्वारे मैत्रिणींशी शेअर केल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक पुण्यात घडली.
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - मोबाईल आणि सोशल मिडीयावर सतत चॅटींग करुन घरातील खासगी गोष्टी शेअर करणा-या संगणक अभियंता पत्नीचा उच्चशिक्षीत पतीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पतीनेही दोरीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या भावांनी घरी जाऊन पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडल्यानंतर बुधवारी रात्री हा सर्व प्रकार उघडकीस आला. उच्चशिक्षीत दाम्पत्याच्या घरामध्ये ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सोनाली राकेश गांगुर्डे (वय ३१, रा. शिवपार्क, मांजरी फार्म रोड, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती राकेश बाळासाहेब गांगुर्डे (वय ३४) याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी हर्षल महेंद्र पवार (वय २५, रा. मेडोज एव्हेन्यू, पाषाण लिंक रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनालीचे शिक्षण ‘बीई कॉम्प्युटर्स’ पर्यंत झालेले असून राकेशचे शिक्षण ‘बीएससी, एमबीए’ पर्यंत झालेले होते. सोनाली गृहीणी होती तर राकेश स्वारगेट येथील एका खासगी केमिकल कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करीत होता. दोघेही मुळचे नाशीकचे आहेत असून त्यांचे चार वर्षांपुर्वी लग्न झाले होते. त्यांना मुलबाळ नव्हते. मागील तीन वर्षांपासून ते हडपसरजवळच्या मांजरी फार्म रस्त्यावर राहत होते.
त्यांचा भाऊ हर्षल आणि कुणाल हे बाणेर - पाषाण लिंक रस्त्यावर राहण्यास आहेत. कुणालचे लग्न झालेले आहे. सोनाली यांना त्यांची आई छाया पवार या बुधवार दुपार पासून फोन करीत होत्या. मात्र त्या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी मुलगा हर्षलला सोनालीच्या घरी पाठविले. हर्षल हे भाऊ कुणाल, चुलत भाऊ डॉ. प्रज्ञावंत देवळेकर, अमोल देवळेकर यांच्यासह शिवपार्क सोसायटीमध्ये बुधवारी रात्री पोचले. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. त्यांनी चावीवाल्याला बोलावून घेतले. लॅच लॉकची किल्ली तयार करुन घेतल्यावरही दरवाजा उघडला जात नव्हता. आतमधून कडी घातलेली होती. सर्वांनी हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने हा दरवाजा धक्के मारुन उघडण्यात आला. तेव्हा सोनाली बेडवर निपचीत पडलेली होती. तर रॅकेशने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. राकेशने सोनालीचा उशीने नाकतोंड दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
आत्महत्येपूर्वी राकेशने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यामध्ये ‘माझी पत्नी फेसबुक, वॉट्सअॅपवर मित्रमैत्रींणींशी वारंवार चॅटिंग करीत असते. आम्हाला मूलबाळ होत नाही, त्याच्या उपचारांची माहिती व घरगुती विषय बाहेरच्यांशीना शेअर करते. यामुळे मी तीची हत्या करीत आहे. यामुळे कोणस दोषी धरू नये.’ असे लिहिले आहे. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माणिक डोके यांच्यासह पथक घटनास्थळी धावले. पुढील तपास सहायक निरीक्षक किरण लोंढे करीत आहेत.
राकेश स्वारगेट येथील एका केमीकल कंपनीमध्ये नोकरी करीत होता. त्याने एक महिन्यापुर्वी ही नोकरी सोडून गुजरातमधील भडूच येथील एका कंपनीमध्ये नोकरी पत्करली होती. त्याने घेतलेला हा निर्णय सोनालीला आवडलेला नव्हता. तो एक महिन्यापासून भडूचला होता. एक आठवड्यापुर्वी तो सोनालीला गुजरातला नेण्यासाठी पुण्यात परत आला होता. परंतु ती गुजरातला जाण्यास तयार होत नव्हती. त्यावरुन दोघांमध्ये वाद होत होते. तिने त्याला तु गुजरातला जा मी येणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. त्यावरुन होणारी कुरबुरही या घटनेमागील एक कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले.