25 वर्षांपासून भाजपा पाठीत खंजीर खुपसतेय - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 07:04 AM2017-01-28T07:04:09+5:302017-01-28T07:51:24+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 जानेवारी रोजी भाजपासोबत काडीमोडी घेतल्याची घोषणा केल्यानंतर आजच्या सामना संपादकीयमधून भाजपाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

Uddhav Thackeray: Khangir Khapsaethe on BJP backing for 25 years | 25 वर्षांपासून भाजपा पाठीत खंजीर खुपसतेय - उद्धव ठाकरे

25 वर्षांपासून भाजपा पाठीत खंजीर खुपसतेय - उद्धव ठाकरे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 -  शिवसेना आणि भाजपामधील युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमधील वाद शिगेला पोहोचताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 जानेवारी रोजी भाजपासोबत काडीमोडी घेतल्याची घोषणा केल्यानंतर आजच्या सामना संपादकीयमधून भाजपाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. 
 
गेल्या 25 वर्षांपासून भाजपा शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतंय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवाय युतीतुटीनंतर शिवसेनेचा गळ्याभोवती आवळलेला फास सुटला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपाची तुलना ढेकणांसोबत करत, 'अशा ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा कदापि भंग पावणार नाही', असे सांगत भाजपावर हल्लाबोल केला आहे. 
 
नेमके काय म्हटलंय 'सामना संपादकीय'मध्ये?
शिवसेना ही नेहमी कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत राहिली, देणारी राहिली. मागणाऱयांच्या रांगेत ती भिकेचे कटोरे घेऊन कधीच उभी राहिली नव्हती. आम्ही मागत राहिलो ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी. हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानच गुंडाळून ठेवला जात असेल तर अशा ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा कदापि भंग पावणार नाही. शिवसेनेचा वाघ पुढे झेपावला आहे. जे पंचवीस वर्षांपूर्वी घडायला हवे होते ते आज घडत असले तरी महाराष्ट्राच्या मनात उसळून येणारा आनंद आम्हाला दिसत आहे. मनात उत्साह, डोक्यात संतापाच्या ठिणग्या आणि मनगटात लढण्याची रग आहे. शिवसेना हा कधीही न विझणारा ज्वालामुखी आहे. म्हणूनच तो जय नावाचा इतिहास आहे!
 
ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा भंगणार नाही!!
पंचवीस वर्षांनंतर महाराष्ट्राने मोकळा श्वास घेतला आहे. हिंदुत्वाच्या गळय़ाभोवती आवळलेला फास सुटला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिवसेनेने एका नव्या विचाराने, ताज्या दमाने झेप घेतली आहे. ही गरुडझेप म्हणा, वाघाची झेप म्हणा, काय हवे ते म्हणा. पण आता शिवसेना थांबणार नाही! निखाऱयांवरून चालण्याची सवय शिवसेनेला आहे. त्याच निखाऱयांवरून चालत शिवसेना ध्येय गाठेल, हे आता नक्की झाले आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबरोबरचे संबंध तोडले आहेत. विधानसभा निवडणुकीतच युती संपली होती. उरले होते ते फक्त संबंध. हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रासाठी आम्हाला एक मिणमिणती आशा होती. पण सत्तांध मंडळींनी त्या मिणमिणत्या आशेवरही शेवटी फुंकरच मारली. त्यांना सत्ता आणि पैशांच्या जोरावर सर्वकाही जिंकायचे होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चूड लावून, गोरगरीब, मध्यमवर्गीयांच्या छाताडावर नाचून राक्षसी विजयोत्सव साजरे करायचे होते. आम्हाला फक्त आमचा महाराष्ट्र आणि हिंदुत्वाचे रक्षण करायचे होते. त्यासाठी घाव झेलायला आमची छाती तयार होती. पण घाव पाठीवर झाले. गेल्या पन्नास वर्षांत असे असंख्य घाव पचवून शिवसेना उभीच आहे. कारण सत्तेच्या चार तुकडय़ांसाठी शिवसेनेचा जन्म नाही. खुर्च्या उबविण्यासाठी देव, धर्म, स्वाभिमान विकून खाणाऱया अवलादीच्या रांगेत शिवसेना कधीच ओशाळवाण्या चेहऱयाने उभी राहिली नाही. सैन्य हे पोटावर चालते असे म्हणतात. शिवसेना हा पक्ष पोटार्थी नाही व पोटावर चालणारा तर अजिबात नाही. आम्ही जात्याच लढवय्ये आहोत व लढण्यासाठी भाडोत्री गुंडांची खोगीरभरती आम्हाला कधीच करावी लागणार नाही. म्हणूनच लढवय्या, झुंजार, निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर आम्ही महाराष्ट्रात युद्धाचे रणशिंग फुंकले आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या जनमानसात जो अंगार खदखदत होता तोच आमच्या मुखातून बाहेर पडला आहे. महाराष्ट्रात कमळ धरणारे हात शोधावे लागत होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी एका हातात मशाल व दुसऱया हातात कमळ धरून पुढे जाण्याचा आदेश दिला. पण उपकारकर्त्याच्या पाठीत वार करणाऱयांना सगळय़ांचाच विसर पडला आहे.
 
सत्तेच्या, पैशांच्या धुंदीने
 
ते बेबंद झाले असले तरी शिवसेना हा फक्त जय नावाचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या भल्यासाठी यापुढे शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे जोखड झुगारून दिले आहे. पंचवीस वर्षांपूर्वी ज्या प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्वाच्या विचारांतून युती झाली तो विचार आज गुंजभरही उरलेला नाही. निवडणुकांतील जागावाटप हा मुद्दा आमच्यासाठी गौण आहे. दोन जागा त्यांच्या वाढल्या व आमच्या वाटय़ाला कमी आल्या म्हणून छाती पिटून आक्रोश करणाऱयांतले आम्ही नव्हेत. शिवसेना ही नेहमी कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत राहिली, देणारी राहिली. मागणाऱयांच्या रांगेत ती भिकेचे कटोरे घेऊन कधीच उभी राहिली नव्हती. आम्ही मागत राहिलो ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी. हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानच गुंडाळून ठेवला जात असेल तर अशा ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा कदापि भंग पावणार नाही. जे लोक हिंदुत्वाच्या नावावर, राममंदिराच्या नावाने, गंगोदकाच्या बाटल्या विकून सत्तेवर आले त्यांनी राममंदिर तर बांधले नाहीच, उलट हिरव्या लुंग्या घट्ट आवळून हिंदू देव-देवतांना महाराष्ट्रातून निर्वासित करण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला. अर्थात, शिवसेनेने नाक दाबल्याने यांचे तोंड उघडले आणि सरकारी कार्यालयातील धार्मिक विधी, सण साजरे करण्यास किंवा भिंतींवरील देव-देवतांच्या तसबिरी लावण्यास मनाई करणारा आदेश मागे घेण्यात आला. अर्थात त्यासाठी शिवसेनेच्या वाघाची डरकाळी मंत्रालयात घुमवावी लागली. म्हणजे लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली म्हणून टिळक आणि शिवाजी महाराज यांना देशद्रोही ठरवून स्वतःचे निधर्मीपण दाखविण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल. काँग्रेस राजवटीपेक्षादेखील ही अवलाद भयंकर निघाली. खरे म्हणजे  हे फर्मान निघाले तेव्हाच आमच्या मनातला अग्नी उसळून बाहेर पडला व अशा हिंदूद्रोही लोकांबरोबर ‘युती’चा संसार पुरे झाला, हे ठरवून टाकले. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली व युतीधर्म पाळला, पण त्यांच्या मनात धर्म नव्हता, तर कपट होते. तसे नसते तर प्रत्येक निवडणुकीकडे त्यांनी जनतेच्या हितापेक्षा
 
स्वतःला पसरण्याची संधी
 
म्हणून पाहिले नसते. आज देशात व महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. त्याचा देशाला व राज्याला काही फायदा झाला असेल तर शपथ! छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारकही आपण राजकीय लाभासाठीच बांधत आहात. पण शिवरायांच्या राष्ट्रनिष्ठsच्या विचारांचे काय? शिवरायांनी ‘धर्म’रक्षणाचे काम केले. धर्माचे राजकारण केले नाही. ते राजे होते, पण रयतेच्या काडीलाही हात लावला नाही. ते देवा-ब्राह्मणांचे रक्षणकर्ते होते. मोगली हल्ल्यातून त्यांनी देव वाचवले. पण सध्याच्या सरकारच्या अंगात मोगल घुसल्याने त्यांनी स्वराज्यातच देवांवर आणि श्रद्धेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण मला मुसलमान म्हणा, या वृत्तीने वागून हे स्वतःस निधर्मी समजणार असतील तर ती देशाशी गद्दारी आहे. त्यांना धर्म राखायचा नाही, तर जागा वाढवून खुर्च्या राखायच्या आहेत. त्यांना कश्मिरी पंडितांना वाचवायचे नाही, तर मेहबुबा मुफ्तीची आरती ओवाळायची आहे. त्यांना हिंदू रक्षणासाठी कठोर पावले उचलायची नाहीत, तर स्वतःबरोबर देशाची सुंता करून जगात ‘निधर्मी’ म्हणून मिरवायचे आहे. जो फायद्याचा असेल तोच धर्म हे त्यांचे धोरण. धर्माची पहिली अट आहे की व्यक्ती किंवा संघटना निरहंकारी, निःस्वार्थी असायला हवी. शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारले, कारण तो कपटी होता. मैत्रीच्या आणाभाका घेत तो गडावर आला, पण त्याच्या हातात महाराजांच्या पाठीत खुपसण्यासाठी खंजीर होता. आम्ही गेली पंचवीस वर्षे या खंजिराचा अनुभव घेतला. हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी हितासाठी आम्ही हे सहन केले. पण पंचवीस वर्षांचा कालखंड वाया गेला, कुजला. त्या वाया गेलेल्या कालखंडाची पर्वा न करता शिवसेनेचा वाघ पुढे झेपावला आहे. जे पंचवीस वर्षांपूर्वी घडायला हवे होते ते आज घडत असले तरी महाराष्ट्राच्या मनात उसळून येणारा आनंद आम्हाला दिसत आहे. मनात उत्साह, डोक्यात संतापाच्या ठिणग्या आणि मनगटात लढण्याची रग आहे. शिवसेना हा कधीही न विझणारा ज्वालामुखी आहे. म्हणूनच तो जय नावाचा इतिहास आहे! भविष्यात त्या ज्वालामुखीत अनेकांच्या समिधा पडतील. म्हणून, आम्ही आताच बजावत आहोत, शिवसेनेच्या वाटय़ाला उगाच जाऊ नका! वाघाने स्वतःची वाट निवडली आहे. वाटमारी करणाऱयांचा फडशा पाडून वाघ झेपावत राहील. शिवसेना जय नावाचा इतिहास आहे! आहेच!!

Web Title: Uddhav Thackeray: Khangir Khapsaethe on BJP backing for 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.