आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By admin | Published: February 3, 2017 07:27 AM2017-02-03T07:27:23+5:302017-02-03T07:52:20+5:30

सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी पारदर्शकतेच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांपर्यंत सर्वांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

We are transparent, are you ?, Uddhav Thackeray's BJP tabled | आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांसाठी शिवसेनेला जबाबदार ठरवून प्रचार मोहिमेतून नाकाबंदी करण्याची व्यूहरचना आखणाऱ्या भाजपा नेत्यांना केंद्रातील स्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी तोंडघशी पाडले आहे. याचाच दाखल देत आज सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांपर्यंत सर्वांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 
 
'पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपवाल्यांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. कोंबडाही फितूर नाही व सूर्यही झाकोळणार नाही. आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय?', असा उलट प्रश्नच उद्धव यांनी भाजपाला केला आहे.
सत्तेच्या जोरावर नागडे नाचणे याला कुणी पारदर्शकता म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न, असा बाण देखील उद्धव यांनी भाजपावर सोडला आहे.
 
भ्रष्टाचारावर शिवसेनेवर वारंवार हल्लाबोल करणा-या किरीट सोमय्या यांना तर उद्धव यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. 
'देशातील 21 महानगरपालिकांत मुंबई महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावून सगळ्याच बोबड्यांची थोबाडे बंद केली आहेत', अशी सोमय्यांवर करण्यात आली आहे. 
 
दरम्यान, केंद्राने मुंबई मनपाला दिलेल्या पारदर्शी कारभाराच्या प्रशस्तीपत्रामुळे प्रचारात भाजपाचे मोठे अस्त्र ठरणाऱ्या या मुद्द्याची हवाच गेली आहे.
(भाजपा पडली तोंडघशी, मुंबई पालिका सर्वात पारदर्शी)
 
काय आहे नेमके सामना संपादकीयमध्ये
 
कोंबडा आमचा, सूर्यही आमचाच!
भारतीय जनता पक्षाचे काय करावे, असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडला असेल. खासकरून त्यांच्या त्या पारदर्शकतेच्या मुद्यावरून. पण त्यांच्याच केंद्र सरकारने आता त्यांना पारदर्शक माती खायला लावली आहे. मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक की काय तसा होणार असेल तर आम्ही शिवसेनेशी युती करू अशी नवी पुडी सोडून ही मंडळी ११४ जागांचा ‘मावा’ बाहेर काढून तो चोळत बसली होती. त्यांची हाव ही नक्कीच जास्त जागांची होती आणि पारदर्शकता हा फक्त बनाव होता हे आता त्यांच्याच केंद्र सरकारने उघड केले आहे. केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा स्वच्छ, पारदर्शक व उत्तम असल्याचे समोर आले. इतकेच नव्हे तर देशातील २१ महानगरपालिकांत मुंबई महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावून सगळय़ाच बोबड्यांची थोबाडे बंद केली आहेत. पारदर्शकता व जबाबदारीच्या मुद्यांवरही मुंबई पालिका शंभर टक्के पुढेच आहे. केंद्र व राज्य सरकारचे विशेष सहाय्य नसतानाही मुंबई महानगरपालिकेने कारभाराच्या बाबतीत जे स्वच्छ यश प्राप्त केले त्याचे श्रेय मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनाही द्यावे लागेल.
 
नागरी सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या बाबतीत मुंबई महापालिकेचे काम वाखाणण्यासारखे आहे. राज्य सरकारातील राजकीय माफियागिरीच्या फालतू आरोपांची पर्वा न करता हे काम झाले. मुख्य म्हणजे सगळेच आर्थिक व्यवहार चोख म्हणजे पारदर्शक असल्याने आरोप करणाऱ्या बोबड्या माफियांवर स्वतःचाच अंगठा झिजेपर्यंत चोखत बसण्याची वेळ आली आहे. भारतीय जनता पक्ष सर्वच निर्णय ‘सर्व्हे’ आणि ‘चिंतन’ करून घेत असतो. खरे तर ‘नोटाबंदी’ निर्णयाने जनता बेजार झाल्याचे चित्र असतानाही पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ‘सर्व्हे’त जनता त्यांच्या बाजूने असल्याचे दाखवले होते. मग मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक असल्याचे प्रशस्तिपत्र केंद्र सरकारनेच दिले आहे. प्रश्न इतकाच आहे की, पारदर्शकतेच्या बाबतीत जे काम मुंबई महानगरपालिकेने केले ते ‘स्वच्छ’ काम आमच्यावर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या ताब्यातील महापालिका करू शकल्या नाहीत. चंदिगढ, दिल्ली, भोपाळ अशा महत्त्वाच्या शहरांतील महानगरपालिका पारदर्शकतेच्या बाबतीत अनागोंदी कारभाराचे शेण खात आहेत व मुंबईच्या तुलनेत त्यांची पारदर्शकता शेवटच्या पायरीवर आहे हे केंद्रीय अहवालातच स्पष्ट झाले आहे. भोपाळचे म्हणाल तर मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे व दिल्लीवर तर स्वतः मोदी यांची हुकमत आहे.
 
मग महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना अभिप्रेत पारदर्शकता तिथे का नाही? मुंबईचे ठेवा बाजूला, खुद्द मुख्यमंत्री ज्या नागपूरचे नेतृत्व करतात त्या नागपूर महानगरपालिकेचे नामोनिशाणही स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या यादीत नसावे यामागची कारणमीमांसा व चिंतन पारदर्शकतेने होणे गरजेचे आहे. स्वतः भ्रष्टाचाराच्या पानपट्टीवर बसून दुसऱ्यांवर पिचकाऱ्या टाकणे सोपे असते, पण जेव्हा पारदर्शक सत्य समोर येते तेव्हा आरोप करणाऱ्यांचीच थोबाडे रंगतात. मुंबई महानगरपालिकेवर वाकडी नजर असणारेच हे असले आरोप करू शकतात. पण कुणी कितीही घाणेरडे आरोप केले तरी मुंबईसह महाराष्ट्राची जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही व आता तर तुमचेच केंद्र सरकारदेखील घाणेरडे आरोप स्वीकारायला तयार नाही. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपवाल्यांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. कोंबडाही फितूर नाही व सूर्यही झाकोळणार नाही. आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय? सत्तेच्या जोरावर नागडे नाचणे याला कुणी पारदर्शकता म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न. सत्ता येते तेव्हा पाय जमिनीवर ठेवावे लागतात. काही लोक कायम हवेत तरंगत असतात. हे तरंगणे आता संपेल व गुडघ्यावर रांगणे सुरू होईल. तो दिवस लांब नाही.

Web Title: We are transparent, are you ?, Uddhav Thackeray's BJP tabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.