संगणकावर मराठीला प्राधान्य द्या

By admin | Published: February 27, 2017 05:42 AM2017-02-27T05:42:01+5:302017-02-27T11:26:16+5:30

महाजाल (इंटरनेट) यावर मराठी भाषेचा वापर वाढावा, म्हणून राज्य सरकारकडून विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

Prioritize Marathi on your computer | संगणकावर मराठीला प्राधान्य द्या

संगणकावर मराठीला प्राधान्य द्या

Next

मुंबई : यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने संगणक आणि महाजाल (इंटरनेट) यावर मराठी भाषेचा वापर वाढावा, म्हणून राज्य सरकारकडून विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात एखादी टिकवण्यासाठी आणि तिच्या विस्तारासाठी संगणक आणि महाजालावरील तिचा वापर आणि वावर सर्वाधिक महत्त्वाचा घटक ठरतो आहे. म्हणूनच राज्यातील प्रत्येकाने महाजालावर मराठीचा वापर वाढविण्याचा आणि प्रत्येक संगणकावर युनिकोड आधारित मराठी कार्यान्वित करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे, असे राज्याचे शिक्षण व मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात, समाजमाध्यमांवर मराठीचा वापर वाढतो आहे, परंतु या वापराचा वेग आणि व्याप्ती वाढणेही आवश्यक आहे. विकिपीडिया हा जगभरातील असंख्य भाषांमध्ये कार्यरत असलेला लोकप्रिय मुक्त ज्ञानकोश आहे. एखाद्या भाषेतील मजकुराची महाजालावरील पृष्ठसंख्या किंवा शब्दसंख्या हा आजच्या काळात संबंधित भाषेच्या मोठेपणाचा, श्रेष्ठत्वाचा निकष ठरतो आहे. हे लक्षात घेऊनच, मराठी भाषा गौरव दिनी, जगभरातील मराठी भाषकांनी मराठी देवनागरी लिपीतील किमान १ परिच्छेद मजकूर ‘मराठी विकिपीडियावर’ लिहावा, असे आवाहन तावडे यांनी केले आहे.
राज्य शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज गेट वे आॅफ इंडियावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह अन्य कलाकारांचा सहभाग असणारा ‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी’ या सांगीतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणासोबतच मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान सोहळा या वेळी पार पडणार आहे. विविध साहित्य-प्रकारांसाठीचे ३३ राज्य वाड्.मय पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत.

(शासकीय संकेतस्थळांना मराठीचे वावडे!)

(राज्य मराठी विकास संस्थेला पूर्णवेळ संचालक मिळेना!)

(मायमराठीसाठी!)

 

 

गेट वे आॅफ इंडिया येथे होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान मारुती चितमपल्ली यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, पुणे येथील भारतीय विचार साधना प्रकाशनाला श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार आणि श्याम जोशी यांना कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ११ पुस्तकांचेही प्रकाशन या वेळी करण्यात येणार असून, विश्वकोश मंडळाच्या वतीने, ‘पेनड्राइव्हमधील विश्वकोशाचे’ लोकार्पणही केले जाणार आहे.


>युनिकोडसाठी चित्रफीत
संगणकावर देवनागरी लिपीचे प्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने आणि देवनागरी लिपीच्या वापराच्या सुलभीकरणासाठी युनिकोडप्रणीत मराठी संगणकावर कार्यान्वित करण्याचे आवाहनही शासनाकडून करण्यात येत आहे. संगणकाच्या विविध कार्यकारी प्रणालींमध्ये मराठी युनिकोड कसे कार्यान्वित करायचे, याची माहिती देणारी चित्रफीत तयार करण्यात आली आहे. ही चित्रफीत सर्व समाजप्रसारमाध्यमांतून प्रसारित करण्यात येणार
आहे. प्रत्येक मराठी माणसाने संगणकांवर युनिकोड मराठी कार्यान्वित करून, मराठी भाषेच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही विनोद तावडे यांनी केले.


>आज कार्यक्रम!
यंदा मराठी भाषा दिन राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा व ग्रंथालये अशा सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. विकिपीडियावर लेखन व युनिकोडमधून मराठी अशा दोन महत्त्वाच्या उपक्रमांसह व्याख्याने, परिसंवाद, स्पर्धा असे विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. राज्यातील ११ विद्यापीठांच्या माध्यमातून, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक आणि जळगाव या ठिकाणी मराठी भाषेच्या गौरवार्थ, सुमारे ४५० कलाकार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. याशिवाय, आज गेट वे आॅफ इंडियावर राज्य शासनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये त्या-त्या ठिकाणच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही तावडे यांनी केले.


>‘मराठीला वैभव, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करू’
मराठी भाषेला तिचे वैभव, प्रतिष्ठा आणि हक्क प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहाणे आवश्यक आहे. मराठीची जोपासना आणि संवर्धन करण्यासोबतच, भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी तिला सक्षम करणेही गरजेचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. संगणकीय डिजिटल माध्यमातून तिचा साहित्य व्यवहार विस्तारला जावा. अनुवादाच्या मदतीने साहित्य आणि ज्ञान या दोन्ही अंगाने तिच्या कक्षा विस्ताराव्या, अशा विविध पद्धतीने ती नव्या युगाशी जोडली जाईल आणि खऱ्या अर्थाने तिला जागतिक भाषा म्हणून गौरव प्राप्त होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


>संयुक्त महाराष्ट्रासाठी जनमत एकत्र येण्याची गरज - डॉ. दीपक पवार
संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी राज्याच्या जनतेत कमालीची उदासीनता असल्याचे मत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी काढले. ते म्हणाले की, येथील बहुसंख्य लोक संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्धल अनभिज्ञ आहेत. नेत्यांमध्ये किंबहुना दिल्लीत बसलेल्या मराठी खासदारांमध्ये या मुद्द्याबद्दल बोलण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही.

Web Title: Prioritize Marathi on your computer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.