मायमराठीसाठी!
By Admin | Published: February 27, 2017 09:55 AM2017-02-27T09:55:53+5:302017-02-27T11:21:33+5:30
आज 27 फेब्रुवारी! मराठी राजभाषा दिन. सालाबादप्रमाणे मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा संकल्प करण्याचा दिवस. त्यानिमित्ताने आज काही शासकीय कार्यक्रमांचे आयोजन होईल,
>
बाळकृष्ण परब, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - आज 27 फेब्रुवारी! मराठी राजभाषा दिन. सालाबादप्रमाणे मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा संकल्प करण्याचा दिवस. त्यानिमित्ताने आज काही शासकीय कार्यक्रमांचे आयोजन होईल, सोशल मीडियावरही अगदी परवापासूनच मराठी दिनाच्या आगावू शुभेच्छा देणारे मेसेज फिरू लागले आहेत. तसे व्हॉट्स अॅप आल्यापासून अशा शुभेच्छांचा सुळसुळाट झालेला आहेच म्हणा. त्यामुळे अशा शुभेच्छांमागे मराठीविषयी आत्मियता किती आणि औपचारिकता किती हा संशोधनाचाच विषय ठरावा. असो,
मराठी माणूस, मराठी भाषा यांचे संवर्धन हा आजच्या काळातील कळीचा विषय बनला आहे. मराठी मरतेय, तिच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे म्हणून आमच्यापैकी बरेचजण गळे काढत असतात, पण प्रत्यक्षात आपला मायबोलीसाठी कुणीच काही करत नाही. खेदाची बाब म्हणजे आज जागतिकीकरण आणि इंग्रजी व हिंदी भाषांच्या आक्रमणासमोर मराठी भाषा ही मराठी माणसाला ओझं वाटू लागली आहे, की काय अशी शंका येते. दुर्दैवाने मराठीविषयी मराठी माणसाच्याच मनात न्यूनगंड निर्माण झालाय! कार्यालयीन ठिकाणी सोडा पण आपापसात बोलतानाही मराठीत बोलणे मराठीजनांस कमीपणाचे वाटू लागलेय! सर्वात कहर म्हणजे आजच्या आया (सॉरी मॉम्स)
आपल्या वर्षा दोन वर्षाँच्या कोवळ्या लेकरांशीही बोबल्या इंग्रजीतून संवाद साधू लागल्या आहेत. बाकी फेसबुक, वॉटसअॅपवरही आपली 'पत' वाढवण्यासाठी इंग्रजीचा बेसुमार वापर करणारे बरेचजण आहेतच! आता अशाने मराठीचे संवर्धन कसे काय होणार?
बरं स्वतःला मराठीचे रक्षणकर्ते समजणारे साहित्यिक, शिक्षक, राजकारणी यांची परिस्थितीही वेगळी नाही. मराठीच्या संगोपन, संवर्धनापेक्षा नसते वाद उकरण्यात यांना अधिक रस. त्यातूनच मग मराठीप्रेम व्यक्त करण्यासाठी दोन चार भैयांना झोडपले जाते. तोडफोड होते, गुजराती, मद्राशी यांच्यावर टीका केली जाते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, मराठी माणसाचे खच्चीकरण होत असल्याची भीती व्यक्त केली जाते, पण त्यातून मायमराठीला कितीसा आणि फायदा होणार?
एकीकडे मराठी शाळा बंद पडताहेत म्हणून रडायचे आणि स्वतःच्या लेकरांना कॉन्व्हेंटमध्ये घालायचे, सभेत मराठीवर व्याख्यान झोडायचे आणि घरी, मित्रमंडळीत इंग्रजीतून गप्पा मारायच्या, वर मराठी ही ज्ञानभाषा नाही, जागतिक पातळीवर तिची फार पत नाही म्हणून नावे ठेवायची हे यांचे मराठीप्रेम!
सध्या साहित्य आणि पत्रकारितेत बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यावरून वाद घातला जातोय. त्यातला एक गट बोलीभाषेसाठी आग्रही आहे, तर दुसरा प्रमाणभाषेसाठी. पण भाषा प्रवाही राहण्यासाठी भाषेत नवनवीन शब्द आलेच पाहिजेत, पण त्याचा अतिरेक होऊ नये!
एवढं वाचल्यावर आता तुम्ही म्हणाल, मग मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करता येईल? खरंतर मराठीच्या रक्षणासाठी संवर्धनासाठी मोठं भव्यदिव्य काहीतरी करण्याची गरज नाही. केवळ आपापसांत मराठीतून संवाद साधल्याने, राज्यातील व्यवहारात, शासकीय कारभारात मराठीला अधिक चालना दिल्यास मराठीचा वापर वाढेल. आजच्या काळात इंग्रजीचे महत्त्व नाकारून चालणार नाही. पण म्हणून आपल्या मुलांशी विनाकारण इंग्रजीतून संवाद साधण्याचीही गरज नाही. मातृभाषा ही शिक्षणाचा पाया असतो. ज्याचा हा पाया पक्का असेल तो पुढे कुठलीही भाषा आत्मसात करू शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा सुळसुळाट झाला असताना शासनाने मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिशचा पर्याय उपलब्ध केल्यास त्याचा खूप चांगला परिणाम होऊ शकेल. कार्यालयीन कामकाजात, रोजच्या प्रवासात, फुटपाथवरच्या परप्रांतीय व्यापा-यापासून ते लोकलमधल्या भांडणांपर्यंत आणि फेसबूकवरच्या स्टेटसपासून व्हॉट्सअॅपवरच्या गप्पांपर्यंत जेवढा मराठीचा वापर होईल, तेवढी मराठी वाढेल. हे खूप सोप्प आहे, पण मनावर कोण घेणार???