परिचारकांच्या निलंबनावरून कामकाज ठप्प
By admin | Published: March 8, 2017 12:59 AM2017-03-08T00:59:06+5:302017-03-08T00:59:06+5:30
सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणारे भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरून सलग दुस-या दिवशी सदस्यांनी विधानपरिषदेचे कामकाज रोखून धरले.
मुंबई : सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणारे भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरून सलग दुस-या दिवशी सदस्यांनी विधानपरिषदेचे कामकाज रोखून धरले. जोपर्यंत परिचारक यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा पवित्रा भाजपा वगळता सर्वपक्षीय सदस्यांनी घेतल्याने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
दुस-या दिवशीचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनासाठी स्थगन प्रस्ताव मांडला. परिचारक यांच्याविषयी सर्वत्र संताप आहे. त्यांच्या घरासमोर तीन हजार सैनिक आाणि त्यांचे कुटुंबीय आंदोलन करीत आहेत. अशा परिस्थितीत सभागृह सुरू ठेवल्यास बाहेर योग्य संदेश जाणार नाही. परिचारकांचे निलंबन झाल्यास सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाविषयी एकही गलिच्छ शब्द बोलण्याची कुणी हिंमत करणार नाही, असे सांगत मुंडे यांनी निलंबनाची मागणी केली. त्याला शिवसेनेच्या नीलम गो-हे, काँग्रेसचे शरद रणपिसे, भाई जगताप आदी सदस्यांनी पाठिंबा दिला. तर, परिचारक यांच्याविषयी मोठा असंतोष असताना राज्यघटनेच्या नियम १९४ अ अन्वये प्रस्ताव मांडायचा मुहूर्त बघताय का, असा सवाल नारायण राणे यांनी केला. त्यावर परिचारक हे आमचे आमदार नाहीत, असे वक्तव्य सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यावर आमचा-तुमचा हा अभिनिवेश इथे आणू नका. सभागृह सदस्याने गुन्हा केलाय, हे अत्यंत ‘पारदर्शक’ आहे. त्यामुळे कारवाई तत्काळ झाली पाहिजे, अशी मागणी भाई जगताप यांनी केली. (प्रतिनिधी)
सभागृहाची भावना लक्षात घेऊन कामकाज तहकूब
या विषयामध्ये नैतिकता महत्त्वाची आहे. सदस्याचा पक्ष कोणता ही बाब गौण आहे. जवान सीमेवर रक्त सांडतात. उणे तापमानात देशाचे संरक्षण करतात. ते तिकडे उभे आहेत म्हणून आपण एसीमध्ये बसून चर्चा करतोय.
परिचारक यांच्यावरील कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक काल व्हायला हवी होती, मात्र ती झाली नाही.
आजही बैठक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सभागृहाची भावना लक्षात घेऊन कामकाज दिवसभरासाठी तहकूब करीत असल्याची घोेषणा सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली.