गोव्यात शिवसेनेला मिळाली अवघी 750 मत, डिपॉझिटही जप्त

By admin | Published: March 14, 2017 05:00 PM2017-03-14T17:00:20+5:302017-03-14T17:40:25+5:30

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना का हरली असा प्रश्न गोवेकरांना खचितच पडलेला नाही. परंतू महाराष्ट्रातील पत्रकार व राजकीय विश्लेषकांना मात्र, तो जरुर पडलेला आहे.

Shiv Sena got only 750 votes in Goa, the deposit was seized | गोव्यात शिवसेनेला मिळाली अवघी 750 मत, डिपॉझिटही जप्त

गोव्यात शिवसेनेला मिळाली अवघी 750 मत, डिपॉझिटही जप्त

Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 14 - गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना का हरली असा प्रश्न गोवेकरांना खचितच पडलेला नाही. परंतू महाराष्ट्रातील पत्रकार व राजकीय विश्लेषकांना मात्र, तो जरुर पडलेला आहे. वास्तविक शिवसेनेने ही निवडणूक का लढविली, हाच मुळी एक गहन प्रश्न आहे. शिवसनेचे गोव्यात अस्तित्वच नाही, तरीही भाजपाला धडा शिकविण्याच्या हव्यासातून हा पक्ष गोव्यात उतरला व त्याने लज्जास्पद कामगिरी बजावली.
सेनेचे गोव्यात अलिकडे अस्तित्व जाणवत नाही. १९९० च्या दशकात संजय हरमलकर सेनेत असताना त्यांनी निर्माण केलेला दरारा अलिकडे साफ उतरला आहे, किंबहुना सेनेच्या शाखाच अस्तित्वात नाहीत. त्या परिस्थितीत सेनेने गोव्यात निवडणुकीच्या तोंडावर एवढा मोठा धोका पत्करणे अव्यवहार्य होते.
राजकीय विश्लेषक मानतात सेनेला महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही भाजपला धडा शिकवून आपले उपद्रवमूल्य दाखवायचे होते़ परंतु या पक्षाची गोव्यात भाजपने दखल घेतली नाही. 
गोव्यात सेनेने महराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व संघाचा बंडखोर गट गोवा सुरक्षा मंचशी युती केली होती़ मगोपने निवडणुकीत २४ जागा, गोवा सुरक्षा मंचने पाच तर सेनेने अवघ्या तीनच जागा लढल्या़ जो मगो पक्ष राज्यात १२ पेक्षा जास्त जागा जिंंकून मुख्यमंत्रीपदावर दावा करु पाहात होता, त्याला नामुष्कीप्रत केवळ तीनच जागा लाभल्या़ त्यांना एकूण एक लाखावर मते प्राप्त झाली व साडे दहा टक्के मते मिळाली. सुरक्षा मंचलाही एकही जागा न मिळाता एकूण १० हजार मते तर सेनेला अवघी ७५० मते मिळून त्यांच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. 
सेना नेत्यांचा होरा होता की, संघाच्या बंडखोरांकडे संघटना आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत निवडणूक लढवली तर भाजपाला चांगलाच अपशकून करता येईल़ दुर्दैवाने संघाचे केडर व मगोपची संघटना प्रत्यक्षात कुचकामी ठरली़ ‘‘ज्यांना गोव्याविषयी सर्वंकष राजकीय भूमिका नाही त्यांना गोमंतकीय थारा देत नाहीत’’ असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत़ सुरक्षा मंचने केवळ इंग्रजीला अनुदान देण्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविली. परंतु मंचचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केवळ मनोहर पर्रीकरांविरुद्ध गरळ ओकली होती़ केवळ वैयक्तिक सुडाचे राजकारणही मतदारांना पसंत पडले नाही, असा राजकीय पंडितांचा होरा आहे. 
सेनेच्या विरोधात आणखी एक मुद्दा गेला तो धरसोड वृत्तीचा़ सेनेने सुरुवातीला गोव्यातील सत्तरी तालुक्यातील कामगार नेते अजितसिंग राणे यांना गोवा प्रमुखपदावरून हटविले़ त्यांच्या जागी दुसरे धडाडीचे कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांची नियुक्ती केली व त्यांनाही निवडणुकीच्या तोंडावर बदलून शिवप्रसाद जोशी यांची नियुक्ती केली. ताम्हणकर यांचे वैर मगोप नेतृत्वाशी असल्याने हे बदल केल्याचे सांगण्यात आले़ परंतु खासदार संजय राऊत यांनी मात्र महिनाभर गोव्यात तळ ठोकून व उद्धव ठाकरे यांनी दोन सभा घेऊन प्रचारात रंग भरला होता.
 
 

Web Title: Shiv Sena got only 750 votes in Goa, the deposit was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.