किल्ले रायगडसाठी ६०७ कोटी
By admin | Published: March 16, 2017 03:38 AM2017-03-16T03:38:29+5:302017-03-16T03:43:44+5:30
शिवकाळात स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकासासाठी ६०७ कोटींचा घसघशीत निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.
मुंबई : शिवकाळात स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकासासाठी ६०७ कोटींचा घसघशीत निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. याशिवाय म्हैसमाळ, वेरु ळ, खुलताबाद, सुलीभंजन आणि लोणार (बुलडाणा) तसेच माहूर देवस्थान (नांदेड) यांच्या विकास आराखड्यांनाही मंजुरी मिळाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बुधवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विकास आराखड्यात पर्यटकांसाठी मुलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याचे फडणवीस यांनी निर्देश दिले. रायगडला शिवसृष्टीसारख्या सुविधा निर्माण करण्यात येतील. रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पद्धतीने डेब्रिज काढणे व उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा आराखड्यात समावेश आहे.
म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा ४३८ कोटी ४४ लाखांचा असून रस्ते विकास, सुलीभंजन व म्हैसमाळसाठी पाणी पुरवठा तसेच मल:निस्सारण, लघु प्रकल्प बांधकाम/साठवण क्षमता वाढवणे, धर्मशाळा बांधणे व हौज-ए-खास, पांगरा आणि धरम तलावांचे सुशोभीकरण करणे, माहिती केंद्र, स्वच्छता गृह, वाहनतळ, पर्यटक निवास, बनी बेगम बाग, खुलताबाद, निजामशाहची कबर, मालोजीराजे भोसले गढी, वेरु ळ इ. संरक्षित स्मारकांचे संवर्धन व जोपासना आदी कामांचा त्यात समावेश आहे.
माहूर देवस्थान (नांदेड) पर्यटन विकास आराखडा २१६ कोटी १३ लाखांचा असून रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, मंदिर परिसर व रस्त्यावर विजेची सोय तसेच भाविकांसाठी शौचालयाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भक्त निवास आदी उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, माहूर देवस्थान येथील वन विभागाच्या १० हजार हेक्टरमध्ये रोहयोच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)