अधिवेशन पुन्हा विरोधकांशिवायच
By Admin | Published: March 29, 2017 03:47 AM2017-03-29T03:47:25+5:302017-03-29T06:27:14+5:30
तीन दिवसांच्या सुट्यांनंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज बुधवारपासून पुन्हा सुरू होणार असले तरी
मुंबई : तीन दिवसांच्या सुट्यांनंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज बुधवारपासून पुन्हा सुरू होणार असले तरी त्यात विरोधी पक्षांचे सदस्य नसतील. कारण विरोधी पक्षांचे सर्व आमदार उद्या नागपुरातून सुरू होणाऱ्या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे स्पष्ट संकेत सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी विधानसभेत दिले होते. तथापि, विरोधकांनी बुधवारी कामकाजात सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही बापट यांनी व्यक्त केली होती.
मात्र, अधिवेशन मुंबईत आणि विरोधक नागपुरात असे चित्र उद्या दिसेल. विरोधी पक्षाने कामकाजावरील बहिष्कार मागे घेतल्याशिवाय १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मूडमध्ये सरकार नाही.
एका ज्येष्ठ मंत्र्यांनी लोकमतला सांगितले की, विरोधकांनी सभागृहात येऊन निलंबन मागे घेण्याची मागणी केली तर तशी घोषणा करण्याचा शब्द सरकारच्या वतीने विरोधकांना शनिवारीच देण्यात आले होते. त्यानुसार ते सभागृहात येणे अपेक्षित होते पण ते आलेच नाहीत. तरीही, २९ तारखेला निलंबन मागे घेण्याचे स्पष्ट संकेत आम्ही दिलेले होते. तरीही विरोधक सभागृहात आले नाहीत. त्यांना कामकाजात सहभागी होण्याची इच्छाच नसेल तर ते न येताच निलंबन मागे घेण्याची आम्हालादेखील गरज वाटत नाही. सर्व आमदारांचे निलंबन एकाचवेळी मागे घेण्याची मागणी गटनेत्यांच्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. तथापि, सरकारने मात्र निलंबन दोन टप्प्यात मागे घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे तिढा कायम राहिला होता. (विशेष प्रतिनिधी)
संघर्षयात्रा आजपासून
नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि १९ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी सर्व विरोधीपक्ष आता रस्त्यावर उतरणार असून चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढण्यात येत आहे. पळसगाव येथून या यात्रेचा शुभारंभ होणार असून ४ एप्रिल रोजी पनवेल येथे समारोप होणार आहे.
या यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. सुनील केदार, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अतुल लोंढे सहभागी होणार आहेत.