मला भाजपाची ऑफर, नकारही नाही आणि होकारही नाही- नारायण राणे
By admin | Published: April 13, 2017 02:13 PM2017-04-13T14:13:30+5:302017-04-13T14:27:20+5:30
मला भाजपाची जुनीच ऑफर आहे, ते सारखे विचारतच असतात अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी दिली आहे
Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - मला भाजपाची जुनीच ऑफर आहे, ते सारखे विचारतच असतात, मी त्यांना हो ही बोललो नाही आणि नाहीही बोललो नाही अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी दिली आहे. हल्ली तुम्हाला भाजपाने ऑफर दिली आहे का ? असं विचारलं असता त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं. नारायण राणे यांनी बुधवारी अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजपामध्ये प्रवेश करण्याचं वृत्त येत होतं. यानंतर मुंबईत परतलेल्या नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपण कोणाचीही भेट घेतली नसल्याचं सांगत सर्व बातम्या फेटाळून लावल्या.
नारायण राणे यांनी आपण काल अहमदाबादमध्ये होतो, मात्र कोणालाही भेटलो नाही असा दावा केला आहे. एकाच गाडीतून प्रवास करण्याबद्दल विचारलं असता राणेंनी खोटं ठरवत प्रश्नांना बगल दिली. तसंच विमानतळापासून हॉटेलपर्यंत माझ्या गाडीने प्रवास केल्याचं त्यांनी सांगितलं. "ग्रँड हयात हॉटेलमध्ये 10.30 माझी वाजता मीटिंग होती. उशीर झाल्याने रात्री हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्यानंतर सकाळी पावणेसात वाजताच्या विमानाने मुंबईला परत आलो", अशी माहिती नारायण राणेंनी दिली आहे.
आपली बाजू मांडताना याआधीही मी मुख्यमंत्र्यांसोबत दोनदा विमान प्रवास केला आहे. एकदा औरंगाबादला दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जात असताना आणि दुस-यांदा बावनकुळेंच्या मुलींच्या लग्नाला गेलो होतो असं नारायण राणेंनी सांगितलं. काँग्रेसविरोधात नाराजी दाखवण्यात आल्याने हे वातावरण निर्माण झालं असल्याचंही राणे बोलले आहेत.
भाजपा ऑफरबद्दल विचारलं असता "मला भाजपाची जुनीच ऑफर आहे, ते सारखे विचारतच असतात. पण मी विचार केलेला नाही. मी त्यांना हो ही बोललो नाही आणि नाहीही बोललो नाही", असं राणेंनी स्पष्ट केलं आहे.
जर पक्ष बदलायचाच असता, तर आधी भेटायला गेलो नसतो, थेट निर्णय घेतला असता असं राणे बोलले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि शहांना भेटलो असतो, तर लपून राहिलं असतं का? असा सवालही राणेंनी यावेळी विचारला. "रात्री साडेदहानंतर कुठेही जात नाही, त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही. मी अमित शहांच्या घरी गेलो म्हणता, मग तिथून बाहेर पडताना वगैरे व्हिडीओ आहे का?", असा उलट सवाल राणेंनी प्रसारमाध्यमांना विचारला.