चौकशी आयोगाकडून सावित्री पुलाची पाहणी
By Admin | Published: May 13, 2017 02:24 AM2017-05-13T02:24:37+5:302017-05-13T02:24:37+5:30
मुंबई - गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघाताच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : मुंबई - गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने शुक्रवारी अपघातग्रस्त पुलाची पाहणी केली. याबाबत चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल सरकारकडे सादर केला जाणार आहे. अपघातानंतर शासन आणि प्रशासकीय यंत्रणेवर चौफेर टीका झाल्यानंतर, सरकारने या अपघाताच्या चौकशीसाठी आयोगाची नेमणूक केली. अपघातानंतर तब्बल ९ महिन्यांनंतर या निवृत्त न्यायाधीश एस. के. शहा यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली .
आयोगाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे. त्यावर शासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. या पुलाच्या अपघातासंदर्भात कुणाकडे काही माहिती असेल, तर ती आयोगापुढे सादर करावी, असे आवाहन आयोगातर्फेकरण्यात आले आहे. या वेळी चौकशी आयोगाचे सचिव एस. आर. खानझोडे, सदस्य अॅड. डीपन मर्चंट, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, अधीक्षक अभियंता सुभाष तिखीले आदी उपस्थित होते.
अपघातग्रस्त पुलाच्या शेजारी नवीन पुलाचे काम सरकारने तातडीने हाती घेतले. हे काम पूर्ण होत आले असले, तरी जुन्या पुलाला झालेला अपघात हा नैसर्गिक आपत्ती होती हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले होते किंवा नाही, त्याची गरज होती का, या सर्वाचा शोध या चौकशी आयोगाकडून घेतला जाणार आहे. मुंबईच्या आयआयटी संस्थेनेही याबाबतचा अहवाल तयार केला असून, चौकशी आयोगाने तो अहवाल मागवून घेतला आहे.