जीआरपीला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा

By admin | Published: June 5, 2017 05:11 AM2017-06-05T05:11:12+5:302017-06-05T05:11:12+5:30

शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे

Waiting for 'mega' recruitment for GRP | जीआरपीला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा

जीआरपीला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा

Next

महेश चेमटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे. मात्र, रेल्वे पोलिसांचे सद्यस्थितीचे मनुष्यबळ पाहता, रेल्वे पोलीस (जीआरपी) दलाला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे. अनेक वर्षांपासून पदांच्या निर्मितीसह कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे प्रवासी सुरक्षा तुटपुंज्या रेल्वे पोलिसांवर असल्याचे दिसून येत आहे.
शहरात सर्वात जास्त प्रवास लोकलने केला जातो. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलीस (जीआरपी) तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे हद्दीतील गुन्हा उघडकीस आणणे, गन्हेगारांचा शोध घेणे, अपघातातील मृत व्यक्तींचा पंचनामा करणे, अशी मुख्य जबाबदारी रेल्वे पोलिसांवर असते. मात्र, रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. १९८१ ते २०१४ या कालावधीत केवळ २३९ पोलीस अधिकारी आणि ३,७८० पोलीस कर्मचारी भरती झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. २००० साली ८७ अधिकारी व ७२३ कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. २०१४ साली रेल्वे पोलीस दलात १०० पोलिसांची भरती झाली होती. मात्र त्यानंतर, अद्यापपर्यंत रेल्वे पोलीस ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.
रेल्वेच्या ३ हजार लोकल फेऱ्यांमधून दररोज ७७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी सुरक्षेसह कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान काही हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी करत आहे. सीएसटी ते कर्जत, कसारा आणि चर्चगेट ते बोर्डी रोड रेल्वे स्थानकांपर्यंतचा परिसर रेल्वे पोलिसांच्या कक्षेत येतो. परिणामी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जीआरपीला अधिकारी पदांसह ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.

Web Title: Waiting for 'mega' recruitment for GRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.