मुख्यमंत्री आल्याशिवाय मला जाळू नका, असे सांगत शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: June 7, 2017 11:45 PM2017-06-07T23:45:33+5:302017-06-07T23:45:33+5:30
मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून वीट (ता. करमाळा) येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने कंटाळून
ऑनलाइन लोकमत
करमाळा, दि. 7 - मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून वीट (ता. करमाळा) येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने कंटाळून बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. एकीकडे शेतकऱ्यांचा संप सुरू असताना करमाळा तालुक्यात घडलेल्या या घटनेने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़
धनाची चंद्रकांत जाधव (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वीट येथील जांभूळझरा येथील वस्तीवर राहणारे धनाजी चंद्रकांत जाधव यांच्यावर सावकार व बँकेचे कर्ज होते. धनाजी यांनी शेतकरी संपात व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वस्ती लगत असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या खिशातून चिठ्ठी निघाली असून त्या चिठ्ठीत ह्यजोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाहीत, तोपर्यंत मला जाळायचं नाहीह्ण असे स्पष्टपणे लिहिले आहे. आत्महत्या केलेले शेतकरी धनाजी जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. एक मुलगा बारावी व दुसरा दहावीला आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले असताना वीटमध्ये धनाजी चंद्रकांत जाधव याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. धनाजी जाधव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात रात्री उशिरा आणण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.