शेतकरी संपात डॉक्टर दाम्पत्याची अशीही साथ
By admin | Published: June 8, 2017 08:14 AM2017-06-08T08:14:23+5:302017-06-08T08:17:11+5:30
शेतकरी संपादरम्यान शेतकरी कुटुंबातील कुणीही आजार झाल्यास त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नरवाडे या डॉक्टर दाम्पत्यानं अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 7 - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यात 1 जूनपासून शेतकरी संपावर गेला आहे. या संपाच्या काळात शेतकरी कुटुंबाला आजार झाल्यास त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वाशिम येथील एका डॉक्टर दाम्पत्यानं एक ते सात जूनपर्यंत मोफत दवाखाना सुरू करुन शेतकरी कुटुंबातील सदस्यांवर उपचार करण्यासचा अभिनव उपक्रम राबविला आहे.
यामध्ये 1 जूनपासून शेकडो रुग्णांना त्यांचा फायदा झाला आहे. हा संप सात जूननंतरही सुरू राहिल्यास शेतकरी कुटुंबातील सदस्यांवरही संप काळात उपचार सुरु राहणार असल्याचे डॉ. नरवाडे यांनी सांगितले.
वाशिम येथील डॉ नरवाडे यांचे पाटणी चौक ते अकोला रस्त्यावरील मुख्य मार्गावर हॉस्पिटल आहे. स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींची त्यांना जाण आहे. घरातील व्यक्ती संपात सहभागी झाल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे कसे दुर्लक्ष होते याची कल्पना आहे. जगाचा पोशिंदा संपावर गेल्यानं त्यांच्या कुटुंबाला आजार झाल्यास त्यांच्याकडं आर्थिक सोय नसल्यानं त्यांना या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी हि व्यवस्था केली असल्याचे डॉ. अमोल नरवाडे व डॉ. करुणा नरवाडे यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. शेतक-यांना प्रत्येक घटकांकडून पाठींबा मिळत आहे. मात्र वाशिम येथील नरवाडे दांपत्याने उचललेले पाऊल नक्कीच प्रेरणादायी ठरणार यात मात्र शंका नाही.
""...तोपर्यंत आम्ही सेवा देत राहणार""
डॉ अमोल नरवाडे यांनी घेतलेला निर्णय स्तुत्य असून जगाच्या पोशिंद्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याच संकल्पनेतून आम्ही जो पर्यंत हा संप सुरु राहील तोपर्यंत आम्ही सेवा देणार आहोत.- डॉ. करुणा नरवाडे