शिवसेनेने सरकारला लाथा घातल्याने कर्जमाफी - उद्धव ठाकरे

By admin | Published: June 13, 2017 08:03 AM2017-06-13T08:03:46+5:302017-06-13T10:20:32+5:30

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता यावरुन श्रेयवादाची नवीन लढाई सुरु झाली आहे.

Debt waiver by Shivsena's government: Uddhav Thackeray | शिवसेनेने सरकारला लाथा घातल्याने कर्जमाफी - उद्धव ठाकरे

शिवसेनेने सरकारला लाथा घातल्याने कर्जमाफी - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 13 - राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता यावरुन श्रेयवादाची नवीन लढाई सुरु झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर्स लावून शिवसेनेने कर्जमाफीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही कर्जमाफी शिवसेनेमुळे शक्य झाल्याचा दावा करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनात शिवसेनेच्या सक्रीय सहभागामुळे सरकारचा गळाच आवळला गेला. सरकारात राहून रोज याप्रश्नी शिवसेनेने लाथा घातल्याचा हा परिणाम आहे. 
 
शिवसेना सरकारात का? या प्रश्नाचेही नेमके उत्तर हेच आहे. शिवसेना सरकारात फक्त खुर्च्या उबवायला बसलेली नाही, तर जे लोक खुर्च्या उबवून अंड्यांची पैदासही करीत नाहीत अशांच्या खुर्च्या हलवायला बसली आहे असे उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या–तोट्याचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही असा अप्रत्यक्ष इशाराही सरकारला दिला आहे. 
 
आणखी वाचा 
 
कर्जमाफी देताना शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची ‘हमी’ कुणी देईल काय? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला नाही. आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून असे कोणतेही हमीपत्र लिहून न घेता मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल हे अभिनंदन आहे असा उपरोधिक टोलाही देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या–तोट्याचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही. शेतकरी आज आनंदात आहे. त्यांचा आनंद द्विगुणित करा. तूर्त तो तत्त्वतः दिवाळी साजरी करील. त्या दिवाळीत विघ्न आणू नका. संप फुटला नाही, शेतकरी मोडला नाही, तर सरकार झुकले हाच या तत्त्वतः दिवाळीचा अर्थ आहे!
 
- शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्तास थांबले आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असून आम्ही त्यांच्या एकजुटीच्या वज्रमुठीचे मनापासून आणि ‘तत्त्वतः’ अभिनंदन करीत आहोत. पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा आक्रोश केला. संप आणि बंदच्या दणक्यानंतर सरकारने दडपशाहीचे प्रकार केले तरी शेतकरी एक राहिला व हाच सरकारचा सगळ्यात मोठा पराभव ठरला. नव्या ‘घोषणे’नुसार अल्पभूधारकांचे कर्ज तत्काळ माफ झाले आहे व सरसकट कर्जमाफीस ‘तत्त्वतः’ मान्यता देऊन सरकारने स्वतःच्या गळय़ाभोवतीचा फास सोडवून घेतला आहे. शेतकरी आंदोलनात शिवसेनेचा संपूर्ण सहभाग होता. त्यामुळे आंदोलन तीव्र झाले व ते इतके तीव्र झाले की, जणू सरकारचा गळाच आवळला गेला. शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी एकतर सरसकट कर्जमाफी करा नाहीतर गुदमरून मरा हाच शिवसेनेचा संदेश आहे. सरसकट कर्जमाफीच्या प्रश्नावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘कॅबिनेट’वर बहिष्कार टाकून हाच इशारा दिला होता. जर तुम्ही शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्राण असेच घेणार असाल तर तुमच्याशी आमचं जमणार नाही व तुमच्या पापात आम्हाला सहभागी व्हायचे नाही ही आमची रोखठोक भूमिका आहे आणि राहणार. 
 
- आम्ही आता मुख्यमंत्र्यांचे फक्त एकाच गोष्टीसाठी अभिनंदन करीत आहोत ती म्हणजे कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची ‘हमी’ कुणी देईल काय? असा प्रश्न त्यांनी केला नाही. आता ‘कुणी’ याचा अर्थ ‘तत्त्वतः’ शिवसेना व इतर संघटना असाच घ्यायला हवा. आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून असे कोणतेही हमीपत्र लिहून न घेता मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल हे अभिनंदन आहे. अर्थात सरकारने ही कर्जमाफी मोकळ्या मनाने व दिलदारीने दिलेली नाही. सरकारात राहून रोज याप्रश्नी शिवसेनेने लाथा घातल्याचा हा परिणाम आहे. शिवसेना सरकारात का? या प्रश्नाचेही नेमके उत्तर हेच आहे. शिवसेना सरकारात फक्त खुर्च्या उबवायला बसलेली नाही, तर जे लोक खुर्च्या उबवून अंड्यांची पैदासही करीत नाहीत अशांच्या खुर्च्या हलवायला बसली आहे. अर्थात उद्याची ‘हमी’ काही आम्ही देऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस तत्त्वतः वगैरे मान्यता दिली तशी तत्त्वतः स्थगिती समृद्धी महामार्गास दिली असती तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन तोफांच्या सलामीने केले असते. मुख्यमंत्र्यांनी ती संधी राज्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने द्यावी अशी आम्ही त्यांना ‘तत्त्वतः’ विनंती करीत आहोत. 
 
- सरकारात एखादे काम रेंगाळत ठेवायचे असेल तर आयोग वगैरे नेमून त्यांच्या अहवालावर वर्षानुवर्षे धुळीचे थर साचवले जातात. तसे अनेकदा ‘तत्त्वतः’ या सरकारी शब्दप्रयोगाचे झाले आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ‘तत्त्वतः’ शब्दाच्या रेशमी फासात अडकून पडू नये. नाहीतर विश्वासघात व उपेक्षेच्या भडक्यात सरकार होरपळून निघेल. तत्त्वतः कर्जमाफीचे निकष सरकारने तत्काळ जाहीर करावेत. फडणवीस सरकारच्या काळात ज्या चारेक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचेही सातबारा कोरे करकरीत व्हावेत. शेतकऱयांच्या मालास हमीभाव मिळावा या मागणीचा रेटा आम्हाला सोडता येणार नाही. या आमच्या मागण्या तत्त्वतः नसून आरपारच्या आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडास पुन्हा पाने पुसण्याचा प्रयत्न झालाच तर गाठ शिवसेनेशीच आहे व शिवसेना आग्या वेताळाच्या भूमिकेत शिरून पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या-तोटय़ाचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही. शेतकरी आज आनंदात आहे. त्यांचा आनंद द्विगुणित करा. तूर्त तो तत्त्वतः दिवाळी साजरी करील. त्या दिवाळीत विघ्न आणू नका. संप फुटला नाही, शेतकरी मोडला नाही, तर सरकार झुकले हाच या तत्त्वतः दिवाळीचा अर्थ आहे!

Web Title: Debt waiver by Shivsena's government: Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.