मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण
By admin | Published: June 27, 2017 03:22 AM2017-06-27T03:22:25+5:302017-06-27T03:22:25+5:30
सलग दोन दिवस पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अलिबागच्या समुद्राला चांगलेच उधाण आले होते.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : सलग दोन दिवस पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अलिबागच्या समुद्राला चांगलेच उधाण आले होते. उंच उडणाऱ्या लाटा पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी किनाऱ्यावर गर्दी केली होती. येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मान्सून पुन्हा पूर्ण ताकदीनिशी सक्रिय झाल्याने, गेल्या ४८ तासांमध्ये त्याने रायगडसह कोकण किनारपट्टीला चांगलेच झोडपून काढले आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने तेथील नागरिकांची चांगलीच अडचण झाली होती. नगरपालिकेने नालेसफाईचा दावा केला असला, तरी वेगाने पाण्याचा निचरा होताना दिसून आले नाही. एकाच वेळी उधाणाची भरती आणि आकाशातून कोसळणारा पाऊस, यामुळे पाण्याचा निचरा होण्याला अडथळा निर्माण झाला होता.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार समुद्राला उधाण येऊन साडेचार मीटरपेक्षा अधिक लाटा उसळणार असल्याने नागरिकांनी अलिबागच्या समुद्रकिनारी गर्दी केली होती. महाकाय लाटा किनाऱ्याला धडकत असताना मोठा आवाज होत होता. जिल्हा प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला असल्याने समुद्राच्या पाण्यात जाण्यापासून मज्जाव करण्यात येत होता. लाटा पाहण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी जमल्याने तेथील विविध स्टॉलधारकांचा धंदा तेजीत होता.
दरम्यान, येत्या २४ तासांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुरुडमध्ये-
अलिबाग तालुक्यातील शिरवली-माणकुले रस्त्यावर समुद्र उधाणाचे पाणी येण्याची परिस्थिती येथे दरवर्षी निर्माण होते. येथील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती गेल्या २० वर्षांपासून खारलॅण्ड विभागाकडून करण्यात आलेली नसल्याने या परिसरातील शेकडो एकर भातशेतीत समुद्राचे खारेपाणी घुसून पिकती भातशेती नापीक झाली आहे.
रविवारी अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली होती. परिणामी, दोन्ही नदीतीरांवरील एकूण १६ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देऊन, आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी दोन्ही नद्यांच्या पातळीत घट झाल्याने संभाव्य धोका टळला असल्याचे रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सावित्री, गाढी, पाताळगंगा, उल्हास या उर्वरित नद्यांची पातळी नियंत्रणात आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-पुणे जुना महामार्ग या विरळ वाहतुकीही सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवार सकाळी ९ वाजल्यापासून पुढील १२० तासांत कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यात आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचेही पाठक यांनी अखेरीस सांगितले.