पोलिसांचे रौद्ररूप पाहून इंद्राणी घाबरली

By admin | Published: June 28, 2017 02:03 AM2017-06-28T02:03:22+5:302017-06-28T02:04:10+5:30

मंजूळा शेट्ये हत्येप्रकरणी नागपाडा पोलिसांनी इंद्राणीसह अन्य काही महिला कैद्यांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

Indrani was afraid to see the police's radar | पोलिसांचे रौद्ररूप पाहून इंद्राणी घाबरली

पोलिसांचे रौद्ररूप पाहून इंद्राणी घाबरली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंजूळा शेट्ये हत्येप्रकरणी नागपाडा पोलिसांनी इंद्राणीसह अन्य काही महिला कैद्यांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान मंजूळाला पोलिसांकडून होत असलेली मारहाण पाहून भितीने बरॅकमध्ये पळ काढल्याचा जबाब इंद्राणीने पोलिसांना दिला आहे.
वॉर्डन मंजूळा शेट्येच्या हत्याप्रकरणात नागपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तसेच कारागृह प्रशासनाकडूनही अंतर्गत चौकशी सुरु आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी भायखळा कारागृहात कैद आहे. मंजूळा शेट्येच्या हत्याप्रकरणात नागपाडा पोलिसांनी तिचाही जबाब नोंदवला आहे.
सकाळी बरॅकमध्ये असताना अचानक जोराचा आवाज झाला. याच आवाजामुळे आम्ही सारे जण बाहेर आलो. तेव्हा मंजूळाला अमानूष मारहाण सुरू होती. ही मारहाण पाहून मी घाबरली. तसेच पोलिसांचे रौद्ररुप पाहून मी बरॅकमध्ये लपून बसल्याचे इंद्रायणीने पोलिसांना सांगितले.
हत्याप्रकरणात तक्रारदार मरियम शेखने दिलेल्या जबाबानुसार इंद्राणीचा जबाबातील माहिती सारखीच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंजूळाच्या हत्येप्रकरणी इंद्राणीला नागपाडा पोलीस साक्षीदार बनविणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते आहे.
याच कारागृहात रमेश कदम यांची बहिण वैशालीही आहे. मंजूळाच्या हत्येनंतर घडलेल्या दंगलीप्रकरणी इंद्राणीसह वैशाली आणि २९१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या दंगलीमध्ये एकूण ७ पोलीस जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन नागपाडा पोलीस ठाण्याचे आहेत. तर ४ कारागृहातील कर्मचारी आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
सीसीटीव्हींची तोडफोड
मंजूळाच्या हत्येनंतर उठलेल्या उद्रेकामुळे महिला कैद्यांनी कारागृहातील वस्तूंची तोडफोड केली. तुटलेल्या भितींतील विटा बाहेरच्या बाजूने फेकल्या. चप्पल, पाण्याचे भांडी, टेबल, खुर्चींची तोडफोड करुन त्यांनी मसल्याचे पाणी पोलिसांवर फेकल्याची माहिती समोर येत आहे. स्वयंपाक घरही त्यांनी उध्वस्त केले. यावेळी या महिलांनी कारागृहातील सीसीटीव्हीं, तसेच त्याच्या मशिनची तोडफोड करण्यात केली आहे. नागपाडा पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात साक्षीदारांबरोबरच महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
मोठे अधिकारीही गैरहजर...
एखादी घटना घडल्यास ती कशापद्धतीने हाताळावी यासाठी प्रत्येक ठिकाणी ठराविक कार्यप्रणाली ठरविण्यात आली आहे. कारागृहातही अशाप्रकारची एखादी घटना घडल्यास त्याबाबत सुरुवातीला शिट्टी वाजवून अन्यथा अलार्म वाजवून सर्वांना सूचित करणे बंधनकारक असते. मात्र मंजूच्या मृत्यूनंतर दंगल घडली तेव्हा या कार्यप्रणालीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच घटनास्थळी वरिष्ठ अधिकारीही हजर नसल्याची माहिती कारागृह सूत्रांकडून मिळाली.
दोन कैद्यांचा पळण्याचा प्रयत्न
मंजूळाच्या हत्याप्रकरणानंतर उठलेल्या दंगलीची संधी साधून दोन कैद्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघींना पुन्हा कारागृहात कैद करण्यात आले. याबाबत कारागृहप्रशासनाकडून काहीही माहिती देण्यात येत नाही आहे.
इंद्राणीची विशेष सीबीआय न्यायालयात धाव-
शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर इंद्राणीने कारागृह प्रशासनाने मारहाण केल्याचा दावा करत विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली.
इंद्राणीने केलेल्या तक्रारीची दखल घेत विशेष न्यायालयाने तिला बुधवारी न्यायालयात हजर करण्याचा आदेश कारागृह प्रशासनाला दिला. इंद्राणीची वकील गुंजन मंगला यांच्या म्हणण्यानुसार, त्या इंद्राणीला भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. त्या वेळी इंद्राणीने तिला मारहाण केल्याचे सांगितले. ‘तिच्या डोक्यावर, हातावर, पायावर व्रण आहेत. तसेच तिला कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी व अधीक्षकांनी शिवीगाळही केली,’ असे मंगला यांनी न्यायालयाला सांगितले.

घातपाताच्या दृष्टीनेही तपास व्हावा - गोऱ्हे 
किरकोळ कारणावरुन भायखळा कारागृहातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंजूळा शेट्ये या महिला कैदीला केलेली मारहाण गंभीर बाब आहे. या मारहाणीत कैद्याचा मृत्यू झाल्याने राज्यातील कारागृह यंत्रणांची प्रतिमा मलिन झाली आहे. 
मंजूळा यांना तुरुंगातील काही गोपनीय बाबी माहिती असल्याने तुरुंगातून सुटका झाल्यावर त्याची वाच्यता होईल, या भितीने त्यांची हत्या झाली का, याचा तपास करावा अशी मागणी शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 
नीलम गोऱ्हे यांनी नागपाडा पोलीस ठाण्याला भेट देवून मंजूळा हत्या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर याबाबत फडणवीस यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली.

Web Title: Indrani was afraid to see the police's radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.