आभाळच फाटलेय, पण शिवून दाखवू - मुख्यमंत्री
By admin | Published: June 28, 2017 02:10 AM2017-06-28T02:10:40+5:302017-06-28T02:10:40+5:30
राज्याने गेली दोन ते तीन वर्षे सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. राज्यात आधीच वित्तीय तूट आहे. आता कर्जमाफी
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याने गेली दोन ते तीन वर्षे सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. राज्यात आधीच वित्तीय तूट आहे. आता कर्जमाफी केल्याने तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. पण त्यातूनही मार्ग काढू, सध्या आभाळच फाटलेय, पण खचून न जाता ते शिवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतल्याबद्दल पुणतांब्यासह परिसरातील ४० गावांतील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन आभार मानले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव अनुदान देण्याची मागणीही केली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्तीचा आमचा निर्धार आहे. वित्त विभागाने १५ हजार कोटींच्या वर कर्जमाफी करू नका, अशा सूचना दिल्या होत्या, मात्र आम्ही त्याच्या पुढे जाऊन कर्जमाफी केली. समृद्धी महामार्गाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होणार आहे. दिलेल्या जमिनी कोल्ड चेन स्टोरेजसाठी वापरणार आहोत. समस्या संपणार नाही, पण पर्याय शोधत राहू. दरवेळेस आंदोलन करायची गरज नाही, चर्चेने नेहमी मार्ग निघू शकतो, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
शेतीसाठी सोलार फिडर-
शेतीसाठी सोलार फिडर आणणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात वीज मिळेल. त्याची सुरु वात राळेगणसिद्धीतून होईल, असेही त्यांनी सांगितले. सध्या जे विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी कर्ज काढावे लागणार होते. मात्र आता कल्पक (इनोव्हेटिव्ह ) पद्धतीने पैसे उभारावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.