मुंबईतील उड्डाणपूल ‘नो पार्किंग झोन’, पार्किंग केल्यास पोलीस कारवाई
By admin | Published: July 4, 2017 02:26 PM2017-07-04T14:26:57+5:302017-07-04T14:29:51+5:30
मुंबईतील फ्लायओव्हरच्या खाली गाड्या पार्क करणा-यांवर कारवाई करण्याचे निर्देशही वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक कोंडी आणि त्यातच पार्किंगला नसलेली जागा यामुळे आधीच मुंबईकर त्रस्त आहे. अनेकदा पार्किंगला जागा नसल्याने उड्डाणपुलाखाली असलेल्या मोकळ्या जागांमध्ये पार्किंग केली जाते. मात्र यापुढे उड्डाणपुलाखाली पार्किंग केल्यास पोलीस कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. कारण मुंबईतील उड्डापुलांच्या खालची जागा ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे.
मुंबईतील रहिवासी प्रणव पोळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रणव पोळेकर यांनी फ्लायओव्हरखाली वाहनतळ उभारणं ही मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात टाकण्यासारखं आहे. तसंच दहशतवाद्यांनी मनात आणलं तर मोठा घातपात होऊ शकतो, असा दावा याचिकेत केला होता. याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने मुंबईतील उड्डापुलांच्या खालची जागा ‘नो पार्किंग झोन’ घोषित केल्याची माहिती दिली.
सोबतच यापुढे मुंबईतील फ्लायओव्हरच्या खाली गाड्या पार्क करणा-यांवर कारवाई करण्याचे निर्देशही वाहतूक पोलिसांना देण्यात आले असल्याचं राज्य सरकारने सांगितलं.
प्रणव पोळेकर यांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानतंर राज्य सरकारने ही माहिती दिली. राज्य सरकारने यामुळे होणारी वाहतूक कोंडी तसंच रस्त्यावर वाढणा-या अवैध पार्किंगचा विचार न करता राज्य सरकारने थेट निर्णय घेतला असल्याने याचिका निकाली निघाली आहे. मात्र येणा-या पुढील दिवसांमध्ये पार्किंगचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.