खडसेंच्या ‘वापसी’बाबत प्रश्नचिन्ह!

By admin | Published: July 7, 2017 04:44 AM2017-07-07T04:44:24+5:302017-07-07T04:44:24+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात परत घेण्यासंदर्भात अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही. खडसेंच्या परतीचा चेंडू मुख्यमंत्री

Khadas 'return' question mark! | खडसेंच्या ‘वापसी’बाबत प्रश्नचिन्ह!

खडसेंच्या ‘वापसी’बाबत प्रश्नचिन्ह!

Next

विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात परत घेण्यासंदर्भात अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही. खडसेंच्या परतीचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात असून, ते यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी योग्यवेळी चर्चा करून निर्णय घेतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
भोसरी (पुणे) एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने आपला अहवाल सादर केला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा अहवाल आणि त्यावर सरकारने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालात खडसे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केलेली नसली तरी काही ताशेरे ओढण्यात आल्याचे समजते. कारवाईची शिफारस नसल्याचे कारण देत खडसेंना मंत्रिमंडळात परत आणायचे की त्यांच्यावर ताशेरे असल्याने त्यांचे परतणे रोखायचे असे दोन पर्याय असून, मुख्यत: मुख्यमंत्री काय निर्णय घेतात आणि श्रेष्ठींसमोर काय भूमिका मांडतात यावर खडसेंचे परतणे अवलंबून असेल. गेल्या वर्षी ४ जून रोजी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्या वेळी भोसरीच्या जमीन खरेदीसह विविध आरोपांनी त्यांना घेरले होते.
सूत्रांनी सांगितले की, उद्या खडसेंना मंत्रिपद पुन्हा बहाल करण्यात आले तरी क्रमांक २चे मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची जागा कायम राहील. शिवाय, खडसेंना पूर्वीचे महसूल मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता नाही. हे खाते पाटील यांच्याकडेच राहील. फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या आधी आणि झाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाची इच्छा लपवून ठेवू न शकलेले खडसे आता मात्र या शर्यतीत दिसत नाहीत. त्यामुळे खडसे हे फडणवीस यांना आव्हान असल्याची परिस्थिती आज राहिलेली नाही.

खडसे मंत्रिमंडळात परतले तर आनंदच
झोटिंग समितीचा अहवाल सचिवांकडे सादर झाला आहे. मुख्यमंत्रीच त्यावर निर्णय घेतील. खडसेंचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला तर आनंदच होईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Khadas 'return' question mark!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.