लाचेची ४० लाखांची रोकड पत्रकार परिषदेत
By admin | Published: July 13, 2017 05:54 AM2017-07-13T05:54:18+5:302017-07-13T05:54:18+5:30
हनुमान नगर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप येवले या आरटीआय कार्यकर्त्याने बुधवारी पत्रकार परिषदेत केला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विक्रोळी पार्क साईट येथील सुमारे अडीच हजार झोपड्या असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप येवले या आरटीआय कार्यकर्त्याने बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच हा घोटाळा लपवण्यासाठी तीन विकासकांनी मिळून लाच म्हणून दिलेल्या ४० लाख रुपयांच्या नोटा येवले यांनी टेबलावर मांडल्याने खळबळ उडाली आहे. ‘एसआरए’चे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरही येवले यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत येवले यांनी ओम्कार, रॉक स्पेसेस आणि लेक व्ह्यू या तीन विकासकांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, तिन्ही विकासकांनी मिळून ११ कोटी रुपयांची लाच देऊ केली होती. त्यातील पहिला हफ्ता म्हणून २९ मे २०१७ रोजी ६० लाख रुपये आणून दिले तर दुसरा हफ्ता म्हणून ३१ मे रोजी ४० लाख रुपये दिले. अशा प्रकारे तब्बल एक कोटी रुपयांची लाच आतापर्यंत दिली. त्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’द्वारे रेकॉर्डिंग केल्याचे पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्यावर आतापर्यंत चार वेळा हल्ला झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे ‘म्हाडा’ आणि ‘एसआरए’कडे दिले आहेत. मात्र प्रशासनाकडून प्रकरण मिटवण्याचा सल्ला देण्यात आला. या प्रकरणी येवले यांनी ‘एसआरए’चे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी कारवाई करण्याऐवजी पाटील यांनी प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप येवले यांनी केला आहे. शिवाय विक्रोळी येथील पोलिसांनीही तक्रार मागे घेण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप येवले यांनी केला आहे.
>‘ती’ रक्कम मुख्यमंत्री निधीत
विकासकांनी लाच स्वरूपात दिलेली १ कोटी रुपयांची रोकड मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करणार असल्याचे येवले यांनी सांगितले.
>‘ती’ रक्कम भाड्यापोटी : येवले यांना आम्ही रोख रक्कम पाठवली. पण ती रक्कम ८८ भाडेकरूंच्या भाडेशुल्कासाठी दिली होती, लाच म्हणून नव्हे, असा दावा ओम्कार बिल्डर्सने आपल्या खुलाशात केला आहे.
>मी लढणारा पाटील आहे!
विश्वास पाटील यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. येवले यांच्या आरोपात तथ्य नाही. माझ्या बदनामीचे काम काही जण करीत आहेत. माझ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत दोन दिवसांत सविस्तर प्रतिक्रिया देईन. मी घाबरणारा नाही, तर लढणारा पाटील आहे, अशी प्रतिक्रिया विश्वास पाटील यांनी रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना दिली.