VIDEO- गोमांस बाळगल्याचा संशय, नागपुरात भाजपा कार्यकर्त्यास बेदम मारहाण

By Admin | Published: July 13, 2017 08:20 AM2017-07-13T08:20:56+5:302017-07-13T22:45:01+5:30

नागपूरमध्ये बीफ बाळगल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला काही अज्ञातांच्या जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

VIDEO: Suspicion of beef beefed, Nagpur workers face drunken assault | VIDEO- गोमांस बाळगल्याचा संशय, नागपुरात भाजपा कार्यकर्त्यास बेदम मारहाण

VIDEO- गोमांस बाळगल्याचा संशय, नागपुरात भाजपा कार्यकर्त्यास बेदम मारहाण

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 13- गोमांस विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी  सलीम इस्माईल शहा (३२, रा. हत्तीखाना, काटोल) नामक तरुणाला बेदम मारहाण केली.  त्याच्या अ‍ॅक्टिव्हाचीही तोडफोड केली.  नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या भारसिंगी येथे बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, सलीम हा भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. या घटनेमुळे बुधवारी सकाळपासून उलटसुलट चर्चा पसरल्याने काटोल -नरखेड तालुक्यात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी सलीमला मारहाण करणा-यांपैकी चौघांना बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे. 
 
मोरेश्वर तांदूळकर (३०, रा. भारसिंगी, ता. नरखेड) जगदीश चौधरी (२८, रा. मदना, ता. नरखेड), अश्विन उईके (२६, रा. नारसिंगी, ता. नरखेड) व रामेश्वर तायवाडे ( २७, रा. जामगाव, ता. नरखेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भारसिंगी येथे गुरुवारी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
 
सलीम शहा हा मागील काही दिवसांपासून गोमांसाची चोरून विक्री करीत असल्याचा भारसिंगी येथील काही तरुणांना संशय होता. तो बुधवारी सकाळी एमएच-४०/एयू-५६३६ क्रमांकाच्या अ‍ॅक्टिव्हाने जलालखेड्याहून भारसिंगी मार्गे काटोलकडे जात असताना काही तरुणांनी त्याला भारसिंगी  बस थांब्याजवळ अडविले. त्याच्या दुचाकीची डिक्की तपासली. त्यात  काही पिशवीत  मांस आढळून आले.  ते गोमांस असल्याचा संशय घेऊन आरोपींनी सलीमला बेदम मारहाण केली. त्याच्या दुचाकीचीही तोडफोड केली. हे गोमांस नसून बैलाचे मांस असल्याचे सलीम सांगत होता. मात्र, आरोपींनी त्याच्या माहितीकडे दुर्लक्ष करीत त्याला अक्षरश: बदडून काढले. त्याचा जीव धोक्यात असल्याचे ध्यानात घेऊन काहींनी या प्रकाराची माहिती  जलालखेडा पोलिसांना दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेले. मारहाणीत सलीम  गंभीर जखमी झाला.  
 
दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समयसूचकता बाळगत सलीमची सुटका केली आणि जमावाला पांगवून त्याला लगेच जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमोपचार करून त्याला लगेच नागपुरातील मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. 
 
दरम्यान, सलीमला जलालखेडा पोलिसांनी विचारणा केली असता त्याने हे मांस बैलाचे असून ते  आमनेर (ता. वरुड, जिल्हा अमरावती) येथून खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सलीमकडून १२०० रुपये किमतीचे मांस आणि ४८ हजार रुपयांची अ‍ॅक्टिव्हा जप्त केली. उलटसुलट आरोपांमुळे जलालखेडा पोलिसांनी सलीमविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला तर, त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सलीमवर मेयोत उपचार करणाºया डॉक्टरांनी त्याची प्रकृती चांगली झाल्यामुळे  गुरुवारी दुपारी त्याला रुग्णालयातून सुटी दिली. 
प्रचंड पोलीस बंदोबस्त-
या घटनेमुळे उलटसुलट अफवा पसरल्याने पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जलालखेडा पोलिसांनी जिल्हा पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस कुमक बोलवून घेतली. भारसिंगी येथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. नागरिकांच्या सहकार्यामुळे परिसरातील गावांमधील वातावरण शांत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नरखेड तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चांगली आहे. काही समाजकंटक उलटसुलट अफवा पसरवत असून, नागरिकांनी त्याकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. 
आरोपींची पोलीस कोठडी-
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोरेश्वर तांदूळकर याचा समावेश आहे. मोरेश्वर  प्रहार  संघटनेचा नरखेड तालुका प्रमुख आहे. चारही आरोपींना पोलिसांनी गुरुवारी काटोल येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडी सुनावली.
अवैध कत्तलखाने-
नरखेड व काटोल तालुक्यात कुठेही वैध व अवैध कत्तलखाने नाहीत. मात्र, लगतच्या आमनेर (ता. वरुड, जिल्हा अमरावती) येथे मागील काही वर्षांपासून अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आमनेर येथे मोठ्या प्रमाणात मांस विक्री केली जाते. काही नागरिक आमनेर येथून मांस खरेदी करतात. 
भाजपाकडून निषेध : कठोर कारवाईची मागणी        
भारसिंगी येथे सलीम इस्माईल शाह याला गोरक्षणाच्या नावावर बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा भाजपने स्पष्ट शब्दात निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.  भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी यासंबंधी एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या घटनेशी भारतीय जनता पक्षाचा कुठलाही संबंध नाही. सलीम शाह हा भाजपचा कार्यकर्ता आहे. सन २०१३ ते २०१६ या कालावधीत तो पदाधिकारी होता. स्वत:ला गोरक्षक म्हणवून घेणाºया कथित गोरक्षकांनी केलेले कृत्य संतापजनक आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. गोरक्षणाच्या नावावर हिंसा करणे, गुंडगिरी करणे, निर्दोष व्यक्तीला मारहाण करणे हे भाजपला मान्य नाही. कुणी जर कायदा हातात घेत असेल आणि गोरक्षणाच्या नावावर हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध शासनाने कडक कारवाई  करावी, अशी मागणीही डॉ. पोतदार यांनी केली आहे. आमदार डॉ. आशिष देशमुख, संघटन मंत्री किशोर रेवतकर, जि.प. शिक्षण सभापती उकेश चव्हाण, तालुका अध्यक्ष शामराव बारई, कार्याध्यक्ष इस्माईल भाई बारुदवाले, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष मोमीनभाई पटेल, रमजानभाई अन्सारी यांनीही या घटनेचा निषेध केला असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.                        
 
बीफ बाळगल्याच्या संशयावरून होत असलेल्या मारहाणीचे लोण महाराष्ट्रातही पसरताना दिसत आहेत. याआधी मे महिन्यात नाशिकच्या मालेगावमध्ये गोरक्षकांकडून गोमांस बाळगल्याच्या संशयावरून काही मांसविक्रेत्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. मालेगावमध्ये २६ मे रोजी ही घटना घडली होती. गोरक्षकांकडून काही लोकांना शिवीगाळ आणि मारहाण झाली होती. त्याबरोबरच त्या गोरक्षकांनी मांसविक्रेत्यांना ‘जय श्रीराम’ बोलण्याची सक्तीही केली होती.  
आणखी वाचा
 
 
 
 

Web Title: VIDEO: Suspicion of beef beefed, Nagpur workers face drunken assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.