एआयबी बॉलिवूड कलाकारांना भोवणार
By admin | Published: February 13, 2015 01:37 AM2015-02-13T01:37:18+5:302015-02-13T01:37:18+5:30
मुंबईत वरळी येथील वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये गेल्या महिन्यात आयोजित केल्या गेलेल्या आणि नंतर यू ट्यूबवरून जगभर प्रसारित करण्यात
मुंबई : मुंबईत वरळी येथील वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये गेल्या महिन्यात आयोजित केल्या गेलेल्या आणि नंतर यू ट्यूबवरून जगभर प्रसारित करण्यात आलेल्या ‘एआयबी’ या अश्लील कार्यक्रमाबद्दल स्टेडियमचे मालक असलेल्या नॅशनल स्पोर्ट््स क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह बॉलिवूडच्या अनेक आघाडीच्या कलाकारांवर गुन्हा नोंदवून तपास करण्याचा आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी दिला.
गेल्या २० जानेवारी रोजी हा कार्यक्रम झाला होता. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौडकर यांनी दाखल केलेल्या खासगी फौजदारी फिर्यादीवर अतिरिक्त महानगर दंडाधिकारी सी. एस. बाविस्कर यांनी ताडदेव पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचा व त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. याधी दौंडकर यांनी ताडदेव पोलिसांकडे लेखी फिर्याद दिली होती. परंतु
त्यात दखलपात्र गुन्हा घडल्याचे स्पष्ट दिसत असूनही त्यांनी त्याची दखल न घेतल्याने अॅड. आभा
सिंग यांच्यामार्फत दंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल केली गेली होती.
यानुसार आता ज्यांच्यावर गुन्हा नोंदविला जाईल त्यांत नॅशनल स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष जयंतीलाल शहा, क्लबचे सरचिटणीस रवींदर अगरवाल, ‘एआयबी’ कार्यक्रमाचे आयोजक यांच्यासह करण जोहर, रणवीर सिंग रोहन जोशी, तन्मय भट, गुरसिमरन खंबा, आशिश शाक्य, आदिती मित्तल, दीपिका पडुकोण, आलिया भट, राजीव मसंद आणि अर्जून कपूर यांचा समावेश आहे.
फिर्यादीनुसार संगनमत व कारस्थान करून जाहीरपणे अश्लील कार्यक्रम आयोजित करणे (भादंवि कलम १२० बी व ३४), जाहिर कार्यक्रमात महिला लज्जीत होतील अशी वक्तव्ये करमे (कलम २९४ व ५०९) पोलिस परवानगीचे उल्लंघन करून जाहीर अश्लील कार्यक्रम करणे ( मुंबई पोलीस कायदा कलम ३३, १३१ व ११०), ‘सीआरझेड’ क्षेत्रात सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी न घेता इच्छित उद्देशाहून अन्य कार्य क्रमासाठी जागेचा वापर करणे (पर्यावरण रक्षण कायदा कलम १५) आणि सार्वजनिक जागेचा इच्छिथ कारणाखेरीज अन्य कारणासाठी वापर करणे (नगररचना कायदा कलम ५२) हे गुन्हे नोंदविले जातील. ते सिद्ध झाल्यास आरोपींना सहा महिन्यांपासून २० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकेल, असे अॅड. आभा सिंग यांनी
सांगितले. (विशेष प्रतिनिधी)