प्राईम टाईमची सक्ती का ? आमिरचा सवाल
By admin | Published: April 9, 2015 10:55 AM2015-04-09T10:55:16+5:302015-04-09T13:56:16+5:30
राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याविषयी लेखिका शोभा डेंनतर आता अभिनेता आमिर खाननेही आक्षेप नोदवला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याविषयी लेखिका शोभा डेंनतर आता अभिनेता आमिर खाननेही आक्षेप नोदवला आहे. ' सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याविषयी राज्य सरकारला कायदा करून सक्ती करण्याची काय गरज होती असा प्रश्न आमिरने विचारला आहे. प्रादेशिक भाषांमधील चित्रपट कायमच बॉलिवूडमधील चित्रपटांपेक्षा सरस ठरले आहेत. त्यामुळे ते दाखवण्यासाठी कायद्याची गरज का? चित्रपट कोणताही, कुठल्याही भाषेतील असो, तो जर प्रेक्षकांना आवडला तर त्याला आपोआपच जास्त शो मिळतात. त्यामुळे मला कायद्याची आवश्यकता वाटत नाही, असे सांगत त्याने या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.
मराठी चित्रपटांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यानंतर या निर्णयाबद्दल विविध स्तरातून अनेक प्रतिक्रिया येत असून नुकतेच लेखिका शोभा डे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत ही सरकारची दादागिरी असल्याची टीका केली होती. त्यावर शिवसेना व राष्ट्रवादीने आक्रमक होत डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव माडंला. तो वाद अद्याप ताजा असतानाचा आमिरनेही प्राईम टाईमच्या सक्तीबाबत प्रश्न उपस्थित करत या वादात उडी घेतल्याने त्यावरही पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.