भाजपा आमदारांची घेतली जातेय हजेरी!

By admin | Published: July 16, 2015 01:54 AM2015-07-16T01:54:35+5:302015-07-16T01:54:35+5:30

भारतीय जनता पार्टीचे आमदार सध्या एका वेगळ्याच सक्तीने त्रस्त आहेत. विधान भवनात ते हजर आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांना दर तासाला एक सही करावी लागत आहे.

BJP MLAs have been taken to the muster! | भाजपा आमदारांची घेतली जातेय हजेरी!

भाजपा आमदारांची घेतली जातेय हजेरी!

Next

- यदु जोशी,  मुंबई
भारतीय जनता पार्टीचे आमदार सध्या एका वेगळ्याच सक्तीने त्रस्त आहेत. विधान भवनात ते हजर आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांना दर तासाला एक सही करावी लागत आहे. सत्ताधारी आमदारांच्या अनुपस्थितीमुळे ऐनवेळी सरकारची तांत्रिक अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
आमदारांच्या सह्या घेण्याची जबाबदारी दहा आमदारांमागे एका आमदाराला देण्यात आली आहे. या आमदारांना एक छापील फॉर्म देण्यात आला आहे. आमदाराचे नाव, त्याची सही आणि किती वाजता सही केली असे तीन कॉलम त्यात आहेत. याबाबत एक आमदार म्हणाले की, दहा आमदारांच्या दिवसभर सह्या घेण्यातच माझा जास्त वेळ जातो; पण उपाय नाही, पक्षाचा आदेश आहे!
साधारण ११ वाजता सभागृह सुरू होते. तेव्हापासून सभागृह संपेपर्यंत हा सहीप्रपंच भाजपाच्या आमदारांना करावा लागतो. ज्या आमदारांकडे सह्या घेण्याची जबाबदारी आहे त्यांना सह्या झालेले फॉर्म पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांच्याकडे रोज जमा करावे लागतात. ही नवीन सक्ती लागू झाल्याने भाजपाच्या आमदारांची विधानसभेतील उपस्थिती लक्षणीय वाढली आहे.
आमदार सभागृहात किती वेळ देतात याचे रिपोर्ट कार्ड उपस्थितीच्या आधारे तयार करण्यात येणार असून, ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळात समावेशाची आस लावून असलेले आमदार तर न चुकता पूर्णवेळ सभागृहात हजर राहतात, असे सध्याचे चित्र आहे. शहा यांनी अलीकडील मुंबई भेटीत पक्षाच्या आमदारांनी अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त केले होते.
आमदार आपापल्या मतदारसंघाला अधिकाधिक निधी मिळावा यासाठी मंत्री, अधिकाऱ्यांकडे चकरा मारत असतात. भाजपाच्या आमदारांना निधी देताना त्यांची सभागृहातील उपस्थिती किती
हा निकषदेखील लावण्यात
येणार असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

मंत्र्यांना पूर्ण वेळ
दालनात राहण्याचे आदेश
आपल्या खात्यासंबंधीचे प्रश्न असले वा कम्पल्सरी सिटिंग असेल तर मंत्री विधानसभेत वा परिषदेत बसून असतात. याशिवाय काही वेळ आपल्या दालनात बसून मंत्री निघून जातात असा आजवरचा बहुतेक मंत्र्यांबाबतचा अनुभव. मात्र, भाजपाच्या मंत्र्यांना सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून सभागृह संपेपर्यंत विधान भवनातच राहण्यास सांगण्यात आले आहे.

आम्ही सत्तारूढ पक्ष आहोत आणि अधिवेशन चालविण्याची जास्त जबाबदारी आमची आहे. वर्षातून साधारणत: ९० ते १०० दिवस अधिवेशन असते. पक्षाच्या आमदारांनी जास्तीतजास्त वेळ विधानसभेत बसावे म्हणून दर तासाला हजेरी घेतली जात आहे. महत्त्वाची विधेयके, धोरणात्मक निर्णय घेताना मतदानाची वेळ आली तर आमदारांना शोधून सभागृहात आणण्याची धावपळ आजवर व्हायची.
- राज पुरोहित, भाजपाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद

सभागृह सुरू झाल्यापासून सभागृह संपेपर्यंत हा सहीप्रपंच भाजपाच्या आमदारांना करावा लागतो. ज्या आमदारांकडे सह्या घेण्याची जबाबदारी आहे त्यांना सह्या झालेले फॉर्म पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांच्याकडे रोज जमा करावे लागतात. ही नवीन सक्ती लागू झाल्याने उपस्थिती वाढली आहे.

Web Title: BJP MLAs have been taken to the muster!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.