मक्का दुर्घटनेत राज्यातील ६ यात्रेकरू बेपत्ता

By admin | Published: September 14, 2015 02:09 AM2015-09-14T02:09:41+5:302015-09-14T02:09:41+5:30

सौदी अरेबियातील मक्का मशिदीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरच्या धावपळीमध्ये भारतातील १५ यात्रेकरु बेपत्ता झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे

6 pilgrims missing in Mecca crash | मक्का दुर्घटनेत राज्यातील ६ यात्रेकरू बेपत्ता

मक्का दुर्घटनेत राज्यातील ६ यात्रेकरू बेपत्ता

Next

जमीर काझी, मुंबई
सौदी अरेबियातील मक्का मशिदीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरच्या धावपळीमध्ये भारतातील १५ यात्रेकरु बेपत्ता झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. शुक्रवार रात्रीपासून त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये मोहम्मद रफीक शेख, यास्मीनबी शेख आणि नौशाद अजुंम अन्सारी हे तिघे जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय हज कमिटीमार्फत देण्यात आलेली आहे. जखमी शेख दाम्पत्य मुंबईतील कुर्ला भागातील रहिवासी असून अन्सारी हे नागपूरचे आहेत.
हैदर सराफुद्दीन, नसीरा बेगम, कादीर शेख, अल्लाउद्दीन उमेर शेख व जाफर शेख अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. त्याशिवाय एमएचआर-७०६ हा कव्हर क्रमांक असलेला यात्रेकरू हरवला असून त्याचे नाव समजू शकलेले नाही. मक्का येथे शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत भारतातून गेलेल्या दोन महिलांचा मृत्यू तर १९ जण जखमी झाले. उर्वरित यात्रेकरु सुखरूप आहेत. जखमींपैकी १५ जण कमिटीमार्फत तर चौघेजण प्रायव्हेट टुर्सद्वारे यात्रेला गेले आहेत. दुर्घटनेनंतर मशीदीच्या परिसरात घबराटीमुळे मोठा गोंधळ उडाला. पळापळी झाल्याने अनेकांची नातेवाईकांशी चुकामुक झाली. सौदी अरेबियाकडून रविवारी त्याबाबत केंद्रीय हज कमिटीला कळविण्यात आले असून भारतातील एकूण १५ यात्रेकरू त्यांची निवास व्यवस्था निश्चित केलेल्या ठिकाणी अद्याप आलेले नाहीत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा यात्रेकरुंचा समावेश आहे. त्याशिवाय दोघे यात्रेकरु हे हैदराबादच्या अफझल टुर्स या प्रायव्हेट प्रवासी कंपनीच्या मार्फत गेले आहेत. भारतीय दुतावास व प्रशासनाकडून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात असल्याचे समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अता-ऊर रहमान यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दुर्घटनेनंतर वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वनियोजनाप्रमाणे विमानाचे उड्डाण करण्यात येत आहे. जखमींची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 6 pilgrims missing in Mecca crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.