जाहिरात करणे येणार अंगलट
By admin | Published: November 5, 2015 03:32 AM2015-11-05T03:32:31+5:302015-11-05T03:32:31+5:30
गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू किंवा पान मसाला यांच्या जाहिराती करणे बॉलीवूड कलाकारांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या उत्पादनांवर बंदी असल्याने या जाहिराती करणाऱ्या
मुंबई : गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू किंवा पान मसाला यांच्या जाहिराती करणे बॉलीवूड कलाकारांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या उत्पादनांवर बंदी असल्याने या जाहिराती करणाऱ्या कलाकारांना नोटिसा पाठवण्याचे एफडीएने ठरविले असल्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून राज्यात गुटखा व तत्सम उत्पादनांवर बंदी आहे. असे असूनही काही बॉलीवूड कलाकार अशा उत्पादनांच्या जाहिराती करतात.
त्यामुळे यासंदर्भात या कलाकारांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यावर कलाकारांचे उत्तर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हे कलाकार रडारवर....
गोविंदा, अजय देवगण, सैफ अली खान व प्रियंका चोप्रा या कलाकारांना नोटीस पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. या कलाकारांनी विविध पानमसाला, सुगंधी सुपारी अशा उत्पादनांच्या जाहिरातीत काम केलेले आहे. याबाबतची अधिकृत माहिती एफडीएकडून लवकरच देण्यात येणार आहे.