स्मशानजोगी समाजाची जात पंचायत बरखास्त
By admin | Published: November 7, 2015 02:56 AM2015-11-07T02:56:44+5:302015-11-07T02:56:44+5:30
शेकडो वर्षांपासून सुरू असलेली व शोषणास कारणीभूत ठरणारी स्मशानजोगी समाजातील जात पंचायत शुक्रवारी बरखास्त करण्यात आली़ पंचांनीच ही घोषणा करत राज्यघटनेलाच
अहमदनगर : शेकडो वर्षांपासून सुरू असलेली व शोषणास कारणीभूत ठरणारी स्मशानजोगी समाजातील जात पंचायत शुक्रवारी बरखास्त करण्यात आली़ पंचांनीच ही घोषणा करत राज्यघटनेलाच आम्ही प्रमाण मानणार, असे स्पष्ट केले़
हमाल पंचायत सभागृहातील बैठकीला स्मशानजोगी समाजाचे राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते़ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला़ आंध्र प्रदेशातून आलेल्या स्मशानजोगी समाजाची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे़ जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्यात हा समाज अनेक वर्षांपासून स्थायिक आहे़ शेकडो वर्षांपासून जात पंचायत व्यवस्था कार्यरत होती़ शेवगाव, सिल्लोड, लातूर, बीड, परभणी आदी ठिकाणी पंचायती भरवण्यात येत. जात पंचायतीतील निर्णय देताना पीडितांसह समोरच्यांकडूनही पैसे घेतले जात़ अधिक पैसे देणाऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले होते. वाळीत टाकणे, नातेसंबंध तोडणे, समाजातून बरखास्त करणे असे शोषण सुरू होते. तक्रारी अंनिसकडे आल्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष रंजना गवांदे यांनी पुढाकार घेऊन प्रबोधन केले़ (प्रतिनिधी)
शेकडो वर्षांचा विळखा सैल
‘पंचायत बरखास्त झाली आता बरकत येईल’, अशी भावना समाजातील लोकांनी व्यक्त केली़ शासनाने समाजाला शिक्षण, आरोग्यासह इतर मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी भावना बैठकीतील उपस्थितांनी व्यक्त केली़