सेल्फी काढण्याच्या नादात बँडस्टँडच्या सुमद्रात दोघे बुडाले
By admin | Published: January 9, 2016 12:50 PM2016-01-09T12:50:21+5:302016-01-09T13:07:56+5:30
सेल्फी काढण्याच्या नादात वांद्र्यातील बँडस्टँड येथील समुद्रात दोन जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
वांद्रे, दि. ९ - वेगवेगळ्या अँगल्समधून, मित्र-मैत्रिणींसोबत सेल्फी काढून ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकण्याचे वेड सध्याच्या तरूणाईला लागले असून त्यापायी ते अनेकदा आपला जीवही धोक्यात घालतात. अशीच एक घटना वांद्र्यातील बँडस्टँड येथे घडली असून सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात दोन जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली.
शनिवारी सकाळी तरूण-तरूणींचा एक ग्रुप बँडस्टँड येथे आला होता, ओहोटी असल्याने ते सगळे समुद्रात पुढपर्यंत जाऊन एका खडकावर उभे राहून फोटो काढत होते. मात्र सेल्फी काढण्यात ते एवढे मश्गूल होते की ओहोटी संपून भरती सुरू झाल्याचेही त्यांच्या लक्षातच आले नाही. थोड्याच वेळात समुद्राचे पाणी वाढू लागले आणि तीन तरूणी पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या मित्राने समुद्रात उडी मारली.
तेथे उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिस व जीवरक्षक दलाच्या जवानांनी तातडीने शोधमोहिम सुरू केली. समुद्रात बुडालेल्या दोन तरूणींना वाचवण्यात यश मिळाले असले तरी एका तरूणीचा मृत्यू झाला असून तो तरूण अद्याप बेपत्ता आहे.