सेल्फीची हौस फिटेना

By admin | Published: January 11, 2016 03:30 AM2016-01-11T03:30:21+5:302016-01-11T03:30:21+5:30

सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडालेल्या कॉलेज तरुणीसह तिला वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून समुद्रात उडी घेतलेल्या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही.

Selfie Haus Fitna | सेल्फीची हौस फिटेना

सेल्फीची हौस फिटेना

Next

मनीषा म्हात्रे , मुंबई
सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडालेल्या कॉलेज तरुणीसह तिला वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालून समुद्रात उडी घेतलेल्या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही. या दोन्ही कुटुंबीयांवर शोककळा पसरली असताना बॅण्डस्टँडवर मात्र सेल्फीची क्रेझ कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पोलिसांसह, अग्निशमन दल, तटरक्षक दलाने तरुणीसह तिला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा शोध थांबवल्याचा आरोप नातेवाईक करीत आहेत
वांद्रे येथील बॅण्डस्टँड येथे शनिवारी सकाळी फिरायला गेलेल्या तरन्नुम अन्सारी, अंजुम खान आणि मुश्तरी खान या तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडाल्या. रमेश वळुंज या तरुणाने जिवाची पर्वा न करता अंजुम आणि मुश्तरीचे प्राण वाचवले. समुद्रात गेलेल्या तरुन्नुमला वाचविण्याच्या प्रयत्नात तो तिच्यासह लाटेच्या प्रवाहात दिसेनासा झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, तटरक्षक दलाकडून जोमाने शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र त्या तुलनेत रविवारी हे शोधकार्य मंदावल्याचा आरोप वळुंज कुटुंबियांनी केला. वांद्रे किल्ल्याच्या तटबंदीपर्यंतचा मार्ग बंद करण्यात आला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या एका घिरटीनंतर येथे कोणी फिरकले नाही. स्थानिक पोलीस ठाण्याची एक व्हॅन फक्त देखरेखीसाठी ठेवण्यात आल्याने आम्ही आमच्या बोटी घेऊन त्यांचा शोध घेत असल्याचे रमेशचे मामा सुरेश सावंत यांनी सांगितले.
एकीकडे दोघांच्या मृतदेहाचा पत्ता लागला नसताना शोधकार्य थंडावले होते. तर सेल्फीच्या नादात दोन जीव गेल्यानंतरही सेल्फीची ‘क्रेझ’ येथे दिसून आली. रविवार मेगाब्लॉक असताना देखील तरुणाई मोठ्या संख्येने बँडस्टँडच्या समुद्रकिनाऱ्यावर तळ ठोकून होती. पाण्यात उभे राहून सेल्फी काढले जात होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती होती. तर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओहोटी होती. तरिही एकमेकांना ढकलून मौजमस्ती देखील आज दिसून आली. विशेष म्हणजे अवघ्या काही तासांपूर्वी सेल्फीच्या नादातूनच जीव गेल्याची थोडीही फिकीर आज परिसरात जाणवली नाही.
मॉरल पोलिसिंगच्या नावाखाली पोलिसांवर झालेल्या कारवाईनंतर येथील जमावाला हटविणे पोलिसांसमोर आता आव्हान बनले आहे. कारवाई केली तरी टीका नाही केली तरी टीका असे दोन्ही बाजूने पोलीस भरडले जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घटनेनंतर या ठिकाणी सतर्कता म्हणून पोलीस लक्ष ठेवून असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वळुंज कुटुंबियांना मदतीची हमी
रमेश वळुंजच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांचा आधार गेला आहे. रविवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी वळुंज कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांनी रमेशच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च तसेच पत्नीला नोकरी मिळवून देण्याची हमी यावेळी दिली. शासनाने रमेशच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळवून द्यावी, अशी मागणी रमेशचे मामा सुरेश सावंत यांनी केली.

Web Title: Selfie Haus Fitna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.