छगन भुजबळ यांनी संपूर्ण रात्र ईडीच्या कार्यालयात काढली
By admin | Published: March 15, 2016 08:30 AM2016-03-15T08:30:31+5:302016-03-15T08:40:15+5:30
अकरा तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री अटक झाल्यानंतर त्यांना संपूर्ण रात्र ईडीच्या कार्यालयात काढावी लागली.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - अकरा तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री अटक झाल्यानंतर त्यांना संपूर्ण रात्र ईडीच्या कार्यालयात ठेवण्यात आले. झोपण्यासाठी म्हणून त्यांना रात्री उशी आणि गादी देण्यात आली होती.
त्यांच्या अटकेची बातमी पसरताच भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक परिसरात काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाल्याच्या बातम्या आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या अटकेवरुन कोणत्याही प्रकारचे आंदोलन करु नका अशा कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.
छगन भुजबळ यांना सकाळी वैद्यकीय चाचणीसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात येईल अशी माहिती आहे. त्यानंतर त्यांची कोठडी मिळवण्यासाठी त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल. छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या नांदगाव मतदारसंघासह लासलगाव आणि येवल्यामध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
आजही कडेकोट बंदोबस्त
भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेता मंगळवारी शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली.
कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन
मुंबईत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर समता परिषद व राष्ट्रवादीतर्फे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्यात आले.