लहानपणापासूनच भारताविषयी द्वेष

By admin | Published: March 26, 2016 03:38 AM2016-03-26T03:38:54+5:302016-03-26T03:38:54+5:30

१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानवर बॉम्बवर्षाव केला. त्यात माझी शाळाही लक्ष्य ठरली. या बॉम्बवर्षावात अनेक लोक मारले गेल्याने लहानपणा

Hate about India since childhood | लहानपणापासूनच भारताविषयी द्वेष

लहानपणापासूनच भारताविषयी द्वेष

Next

मुंबई : १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानवर बॉम्बवर्षाव केला. त्यात माझी शाळाही लक्ष्य ठरली. या बॉम्बवर्षावात अनेक लोक मारले गेल्याने लहानपणापासूनच भारत आणि भारतीयांविषयी माझ्या मनात द्वेष निर्माण झाला, असे अमेरिकन-पाकिस्तानी नागरिक डेव्हिड हेडली याने उलटतपासणीवेळी विशेष न्यायालयाला सांगितले.
लष्कर-ए-तोयबाचा हस्तक असलेल्या डेव्हिड हेडली (५५) याला २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात ‘माफीचा साक्षीदार’ करण्यात आले आहे. ‘लष्कर’चा आणखी एक हस्तक अबू जुंदाल याच्याविरुद्ध सध्या मुंबईत खटला सुरू आहे. त्याचे वकील वहाब खान हेडलीची उलटतपासणी घेत आहेत. अमेरिकेतील अज्ञातस्थळावरून हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उलटतपासणी नोंदवण्यात येत आहे. शुक्रवारी त्याच्या उलटतपासणीचा तिसरा दिवस होता. भारत-पाकिस्तान युद्धात ७ डिसेंबर १९७१ रोजी भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानवर बॉम्बवर्षाव केला. याचा बदला घेण्यासाठी मी लष्कर-ए-तोयबामध्ये सहभागी झालो, अशी माहिती हेडलीने न्या. जी. ए. सानप यांच्यासमक्ष उलटतपासणीवेळी दिली.
तसेच काश्मिरवरून उभय देशांमध्ये वाद सुरू असल्याने काश्मिरींना मदत करण्यासाठीही मी ‘लष्कर’मध्ये सहभागी झालो. काश्मिरींच्या सहाय्याने भारतीय लष्कराशी युद्ध करणे, हेच आमचे उद्दिष्ट होते, असेही हेडलीने सांगितले. २६/११च्या हल्ल्यासाठी मुंबईची रेकी करण्याकरिता पाकिस्तानहून मुंबईत येताना बनावट चलनी नोटा आणल्याची कबुलीही हेडलीनी
दिली.
मुंबईवरील हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नऊ अतिरेक्यांना पाकिस्तान लष्कराचा सर्वोच्च पुरस्कार
‘निशान-ए-हैदर’ देण्याची सूचना हेडलीने साजीद मीर याला केली होती. त्यांच्या कामामुळे हेडली प्रभावित झाला होता.
तसेच कसाबच्या अटकेनंतर त्याला सोडवण्यासाठी नरिमन हाऊसमधील (छाबड हाऊस) अतिरेक्यांना इस्रायलींना वेठीस धरण्याची योजनाही होती. छाबड हाऊसमधील लोकांना ओलीस करून इस्रायल दूतावासाला फोन करायचा आणि त्यांना भारत सरकारशी संपर्क साधून कसाबला सोडवण्यास सांगायचे, असा इरादा लष्कर-ए-तोयबाचा होता. त्यासाठी इस्रायल दूतावासाला फोन करण्याची जबाबदारी हेडलीला देण्यात आली होती.

लष्कर-ए-तोयबाचा कट...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निधी उपलब्ध करण्याच्या कार्यक्रमानिमित्त अमेरिकेत नेण्याचा लष्कर-ए-तोयबाचा हेतू होता. मात्र तिथे आम्ही त्यांची हत्या करणार नव्हतो.
मात्र बाळासाहेब आजारी आहेत, त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा आणि शिवसेनेचे अन्य अधिकारी नेण्याची सूचना राजाराम रेगे यांनी केली होती. 
मी रेगे यांच्याशी बाळासाहेबांनाच अमेरिकेत आणा, असा थेट आग्रह धरला नव्हता. मात्र अप्रत्यक्षपणे मी त्यांना आग्रह केला होता. याची कल्पना लष्कर तसेच डॉ. तहव्वूर राणा यांना दिल्याचेही न्यायालयाला सांगितले.

एफबीआयच्या संशयानंतरही दिल्ली, मिकी माऊस प्रोजेक्ट
२६/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या एफबीआयला हेडलीवर संशय आला होता. त्यांनी डिसेंबर २००८मध्ये फिलाडेल्फिया येथे राहणाऱ्या हेडलीच्या नातेवाइकाची चौकशी केली. याबाबत माहिती देऊनही हेडली एफबीआयच्या अधिकाऱ्यांना भेटला नाही. उलट
त्याने दिल्ली व डेन्मार्कच्या मिकी माऊस प्रोजेक्टची तयारी सुरूच ठेवली.
अमेरिकेत ३५ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या हेडलीने १९८८ ते २००८ यादरम्यान अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात असल्याचा खान यांचा आरोप फेटाळला. माझ्या पाकिस्तानच्या दौऱ्याची माहिती अमेरिकेच्या तपासयंत्रणेला होती, असे म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे, असे हेडलीने म्हटले. हेडलीची उलटतपासणी शनिवारीही सुरू राहणार आहे.

माजी पंतप्रधान गिलानी यांच्याकडून सांत्वन
हेडलीचे वडील रेडिओचे महासंचालक होते. त्यांना डेव्हिडचे लष्करशी संबंध असल्याचे
माहीत होते. त्यांनी यावर आक्षेपही घेतला होता. हेडलीचे अनेक नातेवाईक पाकिस्तान सरकारच्या सेवेत आहेत. त्यातील बहुतांश नातेवाइकांना हेडलीचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध आहेत, याची कल्पना होती.
२६/११ च्या हल्ल्यानंतर महिन्याभरातच म्हणजे २८ डिसेंबर २००८ रोजी हेडलीच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ गिलानी सांत्वन करण्यासाठी हेडलीच्या पाकिस्तानातील घरी गेले होते. (प्रतिनिधी)

इशरत जहाँविषयी कोणी विचारलेच नाही : गुजरातच्या पोलीस चकमकीत ठार झालेली इशरत जहाँविषयी वहाब खान यांनी हेडलीकडे चौकशी केली. राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) इशरत जहाँचे नाव घेण्यास सांगितले, असा आरोप खान यांनी केल्यानंतर हेडलीने एनआयए मला असे का सांगेल? असा प्रतिसवाल केला. राणाच्या खटल्यामध्ये मला कोणीच इशरत जहाँविषयी विचारले नव्हते. एनआयएने माझ्याकडे यासंदर्भात विचारणा केली. एनआयएन मला तिचे नाव घे, असे का सांगेल? असे हेडलीने उलटतपासणीत म्हटले.

Web Title: Hate about India since childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.