सुरेश प्रभूसाहेब, तुमच्यापेक्षा लालूप्रसाद यादव परवडले की हो!

By Admin | Published: August 19, 2016 01:28 PM2016-08-19T13:28:27+5:302016-08-19T13:28:27+5:30

लालूप्रसाद यादवही रेल्वेमंत्री होते, पण ते मुंबईकरांसाठी काही करतील असं मुंबईकरांना कधी वाटलंच नाही... तुमच्या बाबतीत तसं नाहीये, म्हणून असं म्हणायची वेळ येते की तुमच्यापेक्षा लालू परवडले!

Suresh Prabhudasheb, Lalu Prasad Yadav Prabhwale! | सुरेश प्रभूसाहेब, तुमच्यापेक्षा लालूप्रसाद यादव परवडले की हो!

सुरेश प्रभूसाहेब, तुमच्यापेक्षा लालूप्रसाद यादव परवडले की हो!

googlenewsNext
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
 
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू साहेबांना अनावृत्त पत्र...
 
सुरेश प्रभू साहेब,
 
शिवसेनेमधून नरेंद्र मोदींनी तुम्हाला अक्षरश: पळवलं आणि भाजपात आणून रेल्वेमंत्री केलं तेव्हा लाखो मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्या आनंदाची तुलना परकीयांच्या राजवट जाऊन स्वकीयांची सत्ता आल्यावर नेटिव्हांना झालेल्या आनंदाशीच होऊ शकते. पण, अत्यंत खेदानं सांगावं लागतंय की, ज्याप्रमाणे काँग्रेसवर ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचारांपेक्षा, भाजपावर काँग्रेसने केलेले अत्याचार गहीरे होते ही जी काही माननीय पंतप्रधानांची भावना आहे, तीच भावना सर्वसामान्य प्रवासी मुंबईकरांची तुमच्याबाबत आहे.
बदलापूरकर म्हणजे, कुणाच्या अध्यात मध्यात नसलेले आणि मुंबईच्या महागाईने शहराबाहेर हाकलले गेलेले सभ्य मध्यमवर्गीय. प्रचंड उकाड्याच्या मुंबईत दिवसभर झटावं आणि झोपायला थंड हवेच्या बदलापूरात जावं, रविवारी चिखलोली नाही तर कोंडेश्वरला पोराबाळांना घेऊन फिरावं आणि पुन्हा सोमवारी लोकल पकडून मुंबईच्या पोटात शिरावं हा शिरस्ता. अशा मवाळ बदलापूरकरांनी तुमच्या जाचाला कंटाळून तब्बल सहा तास रेल्वे रोखून धरली, हा तुमच्यासाठी बोध घेण्याचा विषय आहे.
 
 
खरं सांगायचं ना, तर जगामध्ये जर काही चांगलं होत असेल ते फक्त भारतीय रेल्वेमध्येच या तुमच्या टिवटिवातलं टिपूसभरदेखील जेव्हा मुंबईच्या लोकलमध्ये दिसत नाही ना, त्यावेळी जखमेवर मीठ टाकल्यासारखं वाटतं आणि कधीतरी मग बदलापूरसारखा उद्रेक होतो. दिवसभरात, 60 - 70 लाख प्रवाशांना मुंबईची रेल्वे वाहते. तुमच्या माननीय, प्रात:स्मरणीय मोदीसाहेबांचा दाखला द्यायचा तर हे आव्हान नाहीये, ही संधी आहे. पाण्याने अर्धा भरलेला ग्लास म्हणजे, अर्ध पाणी, नी अर्धी हवा, वगैरे बोधामृत खूप ऐकली... पण प्रत्यक्षात सगळे ग्लास कोरडेठाक असल्याचं दिसतं ना, त्यावेळी तुमच्या दाव्यांतला पोकळपणा जाणवतो आणि भीक नको पण कुत्र आवर असं सांगायची वेळ येते.
तुम्ही अंगरक्षकांच्या गराड्यात मुंबईच्या लोकलमधून प्रवास केलात, त्याच्या बातम्याही आल्या... पण कचऱ्याच्या गाड्यांमध्ये दट्ट्याने दाबून दाबून कचरा कोंबतात, तसे जेव्हा प्रवासी एकमेकांना कोंबत असतात, त्यावेळी कधीतरी, हवं तर बुरखा घालून प्रवास करा की एकदा!
 
 
तुम्ही आणि तुमचे अधिकारी बघावं तेव्हा स्वच्छतेच्या टिमक्या वाजवत असता... तुमचं मुख्य काम काय? आणि मिरवता काय? तुमच्या स्वच्छता अभियानाचा इतका गर्व असेल, तर सुलभ शौचालयं चालवा, रेल्वेच कशाला पाहिजे त्यासाठी... एखाद्या हॉटेलमध्ये अत्यंत स्वच्छता असेल, परंतु तिथलं खाणं एकदम भुक्कड असेल तर चालेल का?
प्रात:स्मरणीय मोदी साहेबांनी काँग्रेसच्या काळातली रेल्वे कशी सामान्य बुद्धी (मराठीत कॉमन सेन्स) वापरत नाही असं म्हटलं होतं... त्याचा दाखला देताना, ते म्हणाले होते की नाशिवंत मालाची मालगाडी नंतर जाते आणि टिकाऊ मालाची मालगाडी आधी जाते, मग माल सडला तरी चालेल.... रेल्वे अधिकारी कॉमन सेन्स वापरत नाहीत, इत्यादी..
सुरेश प्रभू साहेब, हाच कॉमन सेन्स वापरून एक प्रश्न विचारायचाय, 24 तासांनी फिरोजपूरला, कोलकात्याला किंवा पाटण्याला पोचणारी गाडी मुंबईतून ऐन गर्दीच्या वेळी पाच सात मिनिटं लेट गेली तर चालेल, की लाखोंना वाहणारी लोकल रेल्वे 15 मिनिटं लेट झालेली चालेल, ते ही रोज?
लाखोंच्या गर्दीसमोर ओसंडून जाणारा कॉमन सेन्स, वही सरकारी अफसर, वही सिस्टिम, वही काम... सिर्फ सोच नयी, हे सगळं तुमच्याच बाबतीत आणि ते ही मुंबईच्या बाबतीत कुठे लुप्त होतं? सरस्वती नदी सारखं! किंवा स्विस बँकेतल्या काळ्या पैशासारखं!
मुंबईच्या रेल्वेमध्ये प्रवाशांच्या म्हणे सोयीसाठी स्पीकर्स बसवले आहेत. पायदान आणि प्लॅटफॉर्ममधलं अंतर बघा या निरर्थक सल्ल्याचा आणि अगला स्टेशनचा मारा या स्पीकर्समधून सारखा होत असतो. मुलुंडनंतर भांडूप येतं किंवा विद्याविहारनंतर कुर्ला येतं अशी सगळ्या प्रवाशांना अवगत असलेली बिनकामाची माहिती प्रवाशांच्या कानावर सारखी आदळत असते. पण, प्रवाशांच्या कामाची एकही गोष्ट या स्पीकरमधून बाहेर आल्याचं कुणी ऐकलेलं नाहीये. मोटरमनला झोप येऊ नये म्हणून ही यंत्रणा केल्याची एक वदंता आहे, तसं असेल तर एक विनंती आहे, हे स्पीकर्स केवळ मोटरमनच्या केबिनमध्ये ठेवा, बाकी डब्यातनं काढून टाका, किमान एका पायावर उभं राहणाऱ्यांच्या भांडणांना तरी वाव मिळेल.
आणखी एक मोठा विनोद म्हणजे, गाडी यायला किती वेळ आहे हे दर्शवणारं घड्याळ. समजा, हे घड्याळ 6 मिनिटं दाखवतंय, तर याचा अर्थ असा असायला हवा, की गाडी 6 मिनिटांनी येणारे. पण गंमत म्हणजे बहुतेकवेळा हा 6 चा आकडा 10 - 10 मिनिटं असतो, मग तो अचानक उसेन बेल्टच्या वेगानं शून्यावर येतो.... तुमचं हे घड्याळ केवळ शून्याची वेळ अचूक दाखवतं.... कारण गाडी स्थानकात शिरली की लगेच ते शून्य करून टाकतात रेल्वेचे तत्पर सेवक, त्याच्या आधीचे आकडे केवळ प्रवाशांच्या वांझोट्या समाधानासाठी असतात!
माननीय प्रभूसाहेब, तुम्ही एअरकंडिशंड ट्रेन, बुलेट ट्रेन, एलिव्हेटेड ट्रेन वगैरे वगैरे आणणार आहात. साहेब, आहे त्या पोरांचा खर्च न पेलवणारा माणूस ज्यावेळी आणखी दोन तीन मुलांना जन्म देतो, त्याच्यात नी तुमच्यात काय फरक आहे ते सांगाल का? का या घोषणा हा देखील एक जुमलाच आहे?
भारतीय रेल्वे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचं इंजिन बनू शकतं, असं सलीम - जावेद छाप वाक्य तुम्ही फेकत असता... प्रभू साहेब, देशाची अर्थव्यवस्था असलेल्या मुंबईच्या रेल्वेसेवेमध्ये ब्रिटिशांनी केलेल्या कामाच्या पुढे फार काही न केलेल्या भारतीय रेल्वेकडून अशी अपेक्षा ठेवणं, म्हणजे शोभा डेंनी कुस्तीमध्ये ऑलिंपिकमधलं सुवर्णपदक मिळवून देण्यासारखं आहे.
माननीय पंतप्रधानांनी आया बहिणींना उघड्यावर प्रातर्विधीसाठी जावं लागतं, याचा खेद व्यक्त करत टॉयलेट्सची मोहीम उघडली. याच आया बहिणींना रेल्वेत शिरता यावं यासाठी रग्बी खेळात कमी असेल इतकी ढकलाढकली नी झोंबाझोंबी रोज करावी लागते, याची कधीतरी रेल्वेला शरम वाटते का, प्रभूसाहेब?
सकाळी घरची कामं करायची, रात्री पुन्हा घरची कामं करायची, दिवसा ऑफिसमध्ये काम करायचं आणि या सगळ्यापेक्षा जास्त शक्ती, केवळ गाडीत शिरायला मिळावं, आपल्यासारख्याच असलेल्या इतरजणींची संधी हिरावून घेत धक्काबुक्की करत गाडीत घुसायला मिळावं, असा केवळ सोमालियामध्ये हेलीकॉप्टरमधून फूड पॅकेट्स टाकल्यावर दिसणारा प्रकार रोज करायचा. हा पुरूषार्थ गाजवायची संधी महिलांना रेल्वे मिळवून देते याबद्दल तुमची पाठ थोपटायची का प्रभूसाहेब?
लालूप्रसाद यादवही रेल्वेमंत्री होते, पण ते मुंबईकरांसाठी काही करतील असं मुंबईकरांना कधी वाटलंच नाही... तुमच्या बाबतीत तसं नाहीये, म्हणून असं म्हणायची वेळ येते की तुमच्यापेक्षा लालू परवडले!
बदलापूरमध्ये जे झालं, ते रोज कुठे ना कुठे का होत नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. तुमच्याच पक्षाच्या गिरीराज सिंहांनी म्हटलं की जगामध्ये सगळ्यात नपुंसक समाज कुठला असेल तर हिंदू.... प्रभू साहेब कधीतरी गिरीराज सिंहांना मुंबईच्या लोकलची सैर घडवा, त्यांचं शत प्रतिशत मतपरीवर्तन होईल!

Web Title: Suresh Prabhudasheb, Lalu Prasad Yadav Prabhwale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.