तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर

By Admin | Published: October 26, 2016 06:12 AM2016-10-26T06:12:00+5:302016-10-26T06:12:00+5:30

लोकाभिमुख कामांमुळे राजकीय रोषाला कारणीभूत ठरलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अखेर अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला.

Approval Resolution against Tukaram Mundha | तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर

तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर

googlenewsNext

नवी मुंबई : लोकाभिमुख कामांमुळे राजकीय रोषाला कारणीभूत ठरलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अखेर अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला. अपक्षांसह शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीच्या १०४ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर भाजपाच्या सहा नगरसेवकांनी मुंढेंचे समर्थन केले.
पाच महिन्यांपूर्वी आयुक्तपदी आल्यापासून मुंढे यांनी अतिक्रमण, अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली होती. त्यांना जनतेतून पाठिंबा होता, मात्र या कारवाईमुळे दुखावलेल्या नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला.
मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभागृह नेते जे.डी. सुतार यांनी अविश्वास ठराव मांडला. मुंढे यांनी महापौर व नगरसेवकांचा वारंवार अवमान केला आहे. मनमानीपणे कामकाज करत असल्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्याचे स्पष्ट केले. महापौर सुधाकर सोनावणे यांनीही आयुक्तांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत प्रस्ताव मंजुरीस टाकला. भाजपाच्या सहा नगरसेवकांनी अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात तर अविश्वास ठरावाच्या बाजूने सत्ताधारी राष्ट्रवादीसह अपक्ष, शिवसेना व काँगे्रस अशा एकूण १०४ नगरसेवकांनी मतदान केले. राष्ट्रवादीचे एक नगरसेवक अनुपस्थित होते. ठराव मंजूर होताच शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘मुंढे हटाव’चे फलक झळकावून घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
महासभेमध्ये १०४ विरुद्ध ६ मतांनी मंजूर झालेला अविश्वास ठराव नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
महापालिकेने केलेला एखादा ठराव मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार या खात्याला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आयुक्तांकडून लोकप्रतिनिधींचा वारंवार अवमान होत होता. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी कधीच लोकप्रतिनिधींशी संवाद ठेवला नाही. नागरिकांमधील असंतोष वाढू लागला होता. मनमानीपणे कामकाज सुरू असल्याने त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ परत बोलवावे व नवीन आयुक्तांची नियुक्ती करावी. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई

लोकप्रतिनिधींच्या आरोपांवर सभागृहात उत्तर देण्याची मागणी मी महापौरांकडे केली होती. पण त्यांनी परवानगी दिली नाही. आक्षेपांचे खंडन करण्याची संधीही दिली नाही. माझी नियुक्ती शासनाने केली असून शासनाने बदली केली की जाईन, पण तोपर्यंत काम सुरूच राहील.
- तुकाराम मुंढे, आयुक्त महापालिका

Web Title: Approval Resolution against Tukaram Mundha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.