छगन भुजबळांच्या ठोक्यांची तपासणी सुरू
By admin | Published: October 31, 2016 05:37 AM2016-10-31T05:37:55+5:302016-10-31T05:37:55+5:30
आॅर्थर रोड कारागृहात असलेले माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमितता आहे.
मुंबई : आॅर्थर रोड कारागृहात असलेले माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमितता आहे. हृदयाच्या ठोक्यांतील अनियमिततेचे कारण शोधून काढण्यासाठी रविवारी केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी ‘हॉल्टर मॉनिटरिंग टेस्ट’ सुरू केली आहे. ही तपासणी २४ तास करण्यात येते. सोमवारी ही तपासणी पूर्ण झाल्यावर निदान होईल, अशी माहिती जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली.
सप्टेंबर महिन्यात ताप आल्यामुळे भुजबळांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी व्हायरल फीवर बरोबरच त्यांना हृदयाचा त्रास जाणवू लागला होता. त्यांच्या हृदयाचे ठोके कमी पडत होते. औषधोपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. शुक्रवार, २८ आॅक्टोबरला सायंकाळी पुन्हा एकदा छातीत दुखू लागल्याने भुजबळांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. भुजबळ यांचे सातत्याने हृदयाचे ठोके क3मी पडत असल्याने, त्याचा वेग जाणून घेण्यासाठी हॉल्टर मॉनेटरिंग टेस्ट केली जात आहे. ही टेस्ट जे. जे. रुग्णालयात केली जात असून, केईएममधील डॉक्टर जे. जे.मध्ये आले होते. रविवारी या तपासणीला सुरुवात करण्यात आली. या तपासणीत हृदयाच्या ठोक्यांची आणि हृदयाच्या हालचालीची नोंद घेतली जाते. छोटे डिवाइस संगणकाशी जोडून नोंदणी केली जाते. या तपासणी अहवालानंतर त्यांना नक्की काय झाले आहे, याचे निदान करण्यात येईल, असे
रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
भुजबळ यांना बुधवार, २६ आॅक्टोबरला कारागृहात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर, त्यांना जे. जे. रुग्णालयात आणल्यावर, गॅसचा त्रास असल्याचे निदान झाले. (प्रतिनिधी)