वीजचोरी करणाऱ्यांवर बेस्ट, पोलिसांचे छापे
By admin | Published: October 31, 2016 05:45 AM2016-10-31T05:45:53+5:302016-10-31T05:45:53+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून अॅन्टॉप हिल परिसरातील म्हाडा कॉलनीत बेस्टच्या विजेची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून अॅन्टॉप हिल परिसरातील म्हाडा कॉलनीत बेस्टच्या विजेची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर, आज बेस्ट दक्षता विद्युत पथक आणि अॅन्टॉप हिल पोलिसांनी या ठिकाणी छापा घातला. या वेळी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
अॅन्टॉप हिलमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वीजेचोरी करून, ती अन्य रहिवाशांना विकली जाते. काही रहिवाशी थेट विजेच्या डब्यांमधून वीजचोरी करतात. बेस्ट अधिकारीही येथे येण्यास घाबरतात. मात्र, गेल्या काही महिन्यांत वीजचोरीत अधिकच वाढ झाली. त्यामुळे रविवारी सकाळीच बेस्ट दक्षता विद्युत पथक आणि अॅन्टॉप हिल पोलिसांनी परिसरात छापे घालणे सुरू केले. छाप्यांची माहिती मिळताच, अनेक जणांनी घराला कुलूप ठोकून पळ काढला. त्यानंतर, बेस्ट कर्मचाऱ्यांनी सर्व घरांचा अनधिकृत वीजपुरवठा खंडीत केला. बेस्टने संबंधितांना नोटिशीदेखील बजावल्या आहेत. या वेळी पोलिसांनी विजेची चोरी करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले. चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वीदेखील बेस्टने या परिसरात वीजचोरी करणाऱ्या ४६ घरांवर कारवाई केली होती. (प्रतिनिधी)