पुरुषांनो, मुतारीसाठी मोजा एक रुपया!

By Admin | Published: November 3, 2016 05:52 AM2016-11-03T05:52:35+5:302016-11-03T05:52:35+5:30

पुरुष प्रवाशांना आता यापुढे प्लॅटफॉर्मवरील मुतारीचा वापर करण्यासाठी एक रुपया मोजावा लागणार आहे.

Men, a rupee counting for the picketing! | पुरुषांनो, मुतारीसाठी मोजा एक रुपया!

पुरुषांनो, मुतारीसाठी मोजा एक रुपया!

googlenewsNext


मुंबई : मध्य रेल्वेवरुन लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना आता यापुढे प्लॅटफॉर्मवरील मुतारीचा वापर करण्यासाठी एक रुपया मोजावा लागणार आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून नियोजन केले जात असून त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यात केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. सध्या काही स्थानकात त्याची अंमलबजावणी केली जात असून यात ठाणेसारख्या गर्दीच्या स्थानकांवरही एक रुपया आकारला जात आहे. तर सीएसटी स्थानकात पुन्हा एक रुपया आकारण्यास सुरुवात केली जाणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरुन जवळपास ४0 ते ४५ लाखांच्या दरम्यान प्रवासी प्रवास करतात. यात पुरुष प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. प्रवासात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानकांतील प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या स्वच्छतागृहांतील मुतारींची अवस्था फारच बिकट झाली आहे. पण मुतारींची देखभाल-दुरुस्ती करता यावी आणि प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे महत्व समजावे यासाठी सर्व स्थानकांवर असलेल्या पुरुष मुतारींसाठी एक रुपया आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील सीएसटी, मुलुंड, ठाणे, टिटवाळासह अन्य स्थानकांवर याची अंमलबजावणी सुरू आहे. तर येत्या काही महिन्यात सर्व स्थानकांवर त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सीएसटी स्थानकात काही दिवसांपूर्वीच एक रुपया आकारण्यास सुरुवात केल्यानंतर एका राजकीय पक्षाकडून त्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर काही कालावधीसाठी हा निर्णय मागे घेतल्यानंतर सीएसटीत पुन्हा एक रुपया आकारण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यात ठाणे स्थानकात २२ लाख प्रवाशांची भर पडली आहे. अशा गर्दीच्या स्थानकातून भरघोस उत्पन्न रेल्वेला मिळू शकते, याचा अंदाज बांधत १० आॅक्टोबरपासून ठाणे स्थानकातही स्वच्छतागृहांसाठी एक रुपया आकारला जात आहे. (प्रतिनिधी)
>प्रवासी आणि कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांत वाद
ठाणे स्थानकात असणाऱ्या मुतारींचा वापर करण्यासाठी पुरुष प्रवाशांना एक रुपया मोजावा लागतो. मात्र एक रुपया देण्यावरुन प्रवासी आणि कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेकदा वाद होतात. त्यामुळे एक रुपया आकारला जात असल्याचे मध्य रेल्वेच्या नावासह भित्तीपत्रकेच मुतारींच्या बाजूला लावण्यात आलेली आहेत.

Web Title: Men, a rupee counting for the picketing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.