शिवसेनेने जाहीरनामा रिपिट करून दाखवला- राधाकृष्ण विखे पाटील
By admin | Published: January 23, 2017 06:39 PM2017-01-23T18:39:55+5:302017-01-23T18:40:43+5:30
शिवसेनेने मागील मनपा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे पुन्हा यंदाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करून रिपिट करून दाखवलं
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - शिवसेनेने मागील मनपा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे पुन्हा यंदाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करून रिपिट करून दाखवलं, अशी उपरोधिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
शिवसेनेने आज घोषित केलेल्या जाहीरनाम्याचा विखे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. मागील निवडणुकीत शिवसेनेने करून दाखवलं अशी दर्पोक्ती केली होती. तसे असेल तर मग जुन्या जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे यंदाही पुन्हा जाहीर केल्याबद्दल शिवसेनेने रिपिट करून दाखवलं असंच म्हणावे लागेल, असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आहेत.
जो माझ्या वचननाम्याविरूद्ध बोलेल तो मुंबईद्रोही आहे, या उद्धव ठाकरेंच्या विधानावरही त्यांनी आसूड ओढले. जो शिवसेनेच्या जाहीरनाम्याला विरोध करेल किंवा बोलेल तो मुंबईद्रोही असेल तर मग २०१२च्या जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल उद्धव ठाकरेंना कोणते द्रोही म्हणायचे?, असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला.
(वचननाम्याच्या विरोधात बोलेल तो मुंबईद्रोही - उद्धव ठाकरे)
(युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू, भाजपाचा सेनेला इशारा)
विरोधी पक्षात असताना शिवसेनेने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार कोटींचं पॅकेज देण्याची मागणी केली होती. खड्डेमुक्त मुंबई करण्याचे स्वप्न दाखवले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर यातील एकही आश्वासन शिवसेनेला पूर्ण करता आले नाही. त्यासाठी त्यांना शेतकरीद्रोही, जनताद्रोही नाही तर आणखी काय म्हणायचं?, अशीही विचारणा विखे पाटील यांनी केली. मध्यंतरी मोदींना विरोध करेल तो देशद्रोही, असे भाजपाने म्हटले होते. आता जो शिवसेनेच्या जाहीरनाम्याला विरोध करेल तो मुंबईद्रोही असल्याचे उद्धव ठाकरे म्हणतात. हे पाहता भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष हुकूमशाही मानसिकतेचे असल्याचे स्पष्ट होते, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.