मतमोजणी केंद्रांजवळ मोबाइल बंदी
By admin | Published: February 23, 2017 06:57 AM2017-02-23T06:57:40+5:302017-02-23T08:24:15+5:30
पोलिसांनी मतमोजणी केंद्रांच्या २०० मीटर आवारात मोबाइल बंदीचे आदेश बजावले आहेत
मुंबई : पोलिसांनी मतमोजणी केंद्रांच्या २०० मीटर आवारात मोबाइल बंदीचे आदेश बजावले आहेत. मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन पेजर वापरण्यास आणि घेऊन येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत़
तब्बल २३ मतमोजणी केंद्रांच्या आवारात मोबाइल बंदी करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून हे आदेश लागू करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राच्या आवारात पोलिसांसह अन्य सुरक्षा अधिकाऱ्यांना वगळता, अन्य नागरिकांना अधिकृत (परवाना) किंवा अनधिकृत हत्यारे बाळगण्यास, मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन पेजर वापरण्यास आणि घेऊन येण्यास बंदी घालण्यात आली आहे. खासगी व्यक्तींना मतमोजणी केंद्रांजवळ ध्वनिक्षेपकांचा वापर करणे, मतमोजणीच्या परिसरात मजकूर लिहिणे, प्रसिद्ध करणे व वाहने आणणे, यावर बंदी घालण्यात आली आहे़ प्रवेशपत्र, ओळखपत्राशिवाय येणाऱ्यांनाही प्रतिबंध करण्यात येणार आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भादंवि कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली. दक्षिण मुंबई प्रादेशिक विभागातील आझाद मैदान, मध्य मुंबई प्रादेशिक विभागातील नागपाडा, ना. म. जोशी मार्ग, काळाचौकी, सायन आणि दादर, पूर्व मुंबई प्रादेशिक विभागातील नेहरूनगर, चेंबूर, देवनार, पार्कसाइट, मुलुंड आणि पंतनगर, पश्चिम मुंबई प्रादेशिक विभागातील वांद्रे, वाकोला, आंबोली, अंधेरी आणि साकिनाका, तर उत्तर मुंबई प्रादेशिक विभागातील मालाड, एम.एच.बी., बोरीवली व कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मतदान केंद्रांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलीसही सज्ज
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, या दरम्यान वाहतुकीत काही अडथळे येऊ नयेत, म्हणून वाहतूक पोलीसही सज्ज झाले आहेत.
या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, वाहतूककोंडी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. हा बंदोबस्त २३ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
जवळपास ३,५०० वाहतूक पोलीस मुंबईत तैनात करण्यात आले आहेत. २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केंद्राजवळही वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. या दिवशी मुंबईतील मतमोजणी केंद्रांजवळ काही ठिकाणी नो पार्किंगही करण्यात येणार आहे.