बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीसाठी ‘तो’ पोलीस मुंबईत

By Admin | Published: February 28, 2017 05:11 AM2017-02-28T05:11:23+5:302017-02-28T05:11:23+5:30

काही दिवसांपूर्वी तब्येतीवरून मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांची खिल्ली उडवली होती

Police for bariatric surgery | बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीसाठी ‘तो’ पोलीस मुंबईत

बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीसाठी ‘तो’ पोलीस मुंबईत

googlenewsNext


मुंबई : सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी काही दिवसांपूर्वी तब्येतीवरून मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांची खिल्ली उडवली होती, ते दौलतराम जोगावत आता वजन घटविणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून वैद्यकीय मदतीसाठी आवाहन करून जोगावतही आपल्या सर्जरीसाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल झाले.
दौलतराम यांचे वजन सध्या १८० किलो इतके आहे. जोगावत यांच्या वैद्यकीय चाचण्यांनंतर प्रसिद्ध बेरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला सर्जरीविषयी निर्णय घेतील, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, शोभा डे यांनी आपली खिल्ली उडवल्याबद्दल दौलतराम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. १९९३ पर्यंत माझी प्रकृती सर्वसाधारण होती, पण पित्ताशयाचा आजार बळावल्याने इन्सुलिनचे प्रमाण वाढले आणि वजन वाढत गेले, असे दौलतराम यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी शोभा डे यांनी दौलतराम यांचा फोटो टिष्ट्वटरवर शेअर करून ‘मुंबईत हेवी बंदोबस्त’ अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती. शोभा डे यांच्या टिष्ट्वटला मुंबई पोलिसांनीही तितकेच संयमी उत्तर दिले होते. (प्रतिनिधी)
>उपचारांचा खर्च द्या
शोभा डे यांच्या खोचक प्रश्नाला उत्तर देताना जोगावत यांनी, ‘अति खाण्यामुळे माझे वजन वाढलेले नाहीये,’ असे म्हणत, ‘बारीक होणे कुणाला आवडत नाही?’ असेही म्हटले होते. शिवाय, ‘मॅडमने माझ्या उपचारांचा खर्च द्यावा,’ असा टोलाही जोगावत यांनी डे यांना लगाविला होता.

Web Title: Police for bariatric surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.