शिवाजी पार्कमध्ये रंगले 'सेल्फी'श राजकारण

By Admin | Published: March 2, 2017 10:01 PM2017-03-02T22:01:16+5:302017-03-03T01:56:40+5:30

दादारमधील शिवाजी पार्क येथे मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी उभारलेल्या सेल्फी पॉइंटवरून सध्या राजकारण रंगले

Selfie politics in Shivaji Park | शिवाजी पार्कमध्ये रंगले 'सेल्फी'श राजकारण

शिवाजी पार्कमध्ये रंगले 'सेल्फी'श राजकारण

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने मनसेला पराभूत केल्यानंतरही दादर - शिवाजी पार्कवरून उभय पक्षांतील वाद मिटलेला नाही. यात आता भाजपानेही उडी घेतल्यामुळे येथील सेल्फी पॉइंटवरूनही तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या कल्पनेतून दादर-शिवाजी पार्क येथे मुंबईतील पहिले सेल्फी पॉइंट सुरू झाले. मात्र या प्रभागातून महापालिका निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांचा शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी पराभव केला. त्यानंतर सेल्फी पॉइंटच्या देखभालीसाठी आता कॉर्पाेरेट सामाजिक बांधिलकीतून मिळणारा निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत देशपांडे यांनी हा पॉइंट बंद करण्याची घोषणा मंगळवारी केली.
ही संधी साधून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी दादरमध्ये फलकबाजी करत सेल्फी पॉइंट सुरू करणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे भाजपानेही यात रस घेत सेल्फी पॉइंट अधिक आकर्षक करू, असे जाहीर केले. एवढेच नव्हेतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पालिकेच्या सहायक आयुक्तांशी बुधवारी पत्रव्यवहार करून तत्काळ त्यासाठी परवानगीही मिळवली. त्यामुळे मनसेनेही आपला निर्णय मागे घेऊन कोणी यात नाक खुपसू नये, असा सज्जड इशारा शिवसेना- भाजपाला दिला आहे.
दरम्यान, हा वाद विकोपाला गेल्याची चिन्हे निर्माण झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा पॉइंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाध्यक्षांचा आदेश आल्याने अवघ्या काही तासांतच देशपांडे यांनी सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्यात देशपांडे यांनी ‘कोणी यात नाक खुपसू नये...’ असा सज्जड इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)
>भाजपा सेल्फी पॉइंटवर 
सेल्फी पॉइंटवरून मनसे आणि भाजपात व्टिटर युद्ध रंगले आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कचा सेल्फी पॉइंट बंद करण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दादर शिवाजी पार्कवरील तरुणाईचे आकर्षण ठरलेला सेल्फी पॉइंट आता भाजपा अधिक आकर्षक पद्धतीने उभारणार.. लवकरच भेटू सेल्फी पॉइंटवर! असे व्टिटरवरून तरुणांना आवाहन केले़
>शिवसेनेची फलकबाजी
शिवसेनेच्या दादरमधील नवनिर्वाचित नगरसेविका विशाखा राऊत यांनीही शिवाजी पार्कच्या सेल्फी पॉइंटची जबाबदारी यापुढे शिवसेना स्वीकारत आहे. लवकरच आम्ही नवीन कल्पकता असलेला सेल्फी पॉइंट आपणास देऊ! अशा आशयाचे होर्डिंग शिवाजी पार्क येथे लावून मनसेला डिवचले आहे.

 

Web Title: Selfie politics in Shivaji Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.