जस्टिन बिबरच्या राजेशाही थाटाने मायकल जॅक्सनची आठवण
By admin | Published: May 10, 2017 10:00 AM2017-05-10T10:00:47+5:302017-05-10T11:48:28+5:30
जस्टिन बिबरच्या नवी मुंबईत होणा-या म्युझिकल कॉन्सर्टच्या निमित्ताने अनेकांच्या मनात दिवंगत पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या मुंबई भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - कॅनडियन पॉपस्टार जस्टिन बिबरच्या नवी मुंबईत होणा-या म्युझिकल कॉन्सर्टच्या निमित्ताने अनेकांच्या मनात दिवंगत पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या मुंबई भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पॉप संगीताचा किंग मायकल जॅक्सन 21 वर्षांपूर्वी 1996 साली मुंबईत आला होता.
आज ज्या प्रमाणे जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टची सर्वत्र चर्चा आहे तशीच त्यावेळी मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टची सर्वत्र चर्चा झाली होती. जॅक्सनच्या विमानतळावरील आगमनापासून ते त्याच्या हॉटेल रुममधील प्रत्येक बारीकसारीक गोष्टीला वृत्तपत्रांनी ठळक प्रसिद्धी दिली होती. आजच्या तरुणाईवर ज्या प्रमाणे जस्टिन बिबरच्या पॉप संगीताची जादू आहे तशीच त्यावेळी मायकलची गाणी, डान्स आणि मूनवॉकने तरुणाईला वेड लावले होते.
1 नोव्हेंबर 1996 रोजी अंधेरी स्पोटर्स कॉम्पलेक्समध्ये झालेल्या मायकलच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. जस्टिन बिबरच्या म्युझिकल कॉन्सर्टचे तिकीट सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे तसेच त्यावेळी मायकलच्या कॉन्सर्टचे तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते. तरीही देशभरातील मायकलच्या चाहत्यांनी ही महागडी तिकीटे विकत घेऊन मायकला प्रत्यक्ष "याची देहा, याची डोळा" पाहण्याची संधी सोडली नाही.
मुंबई दौ-यावर आलेल्या बिबरचा जो राजेशाही थाट दिसतोय. तसाच थाट त्यावेळी मायकलच्या दौ-याचा होता. मायकल जॅक्सनचे त्याच्या प्रायवेट जेट विमानाने मुंबईत आगमन झाल्यानंतर त्याच्यासोबतच लवाजमा अन्य चार विमानांमधून आला. मायकलला पाहण्यासाठी विमानतळावर एकच गर्दी झाली होती. विमानतळावर उतरल्यानंतर मायकलचे खास मराठमोळया पद्धतीने ओवाळणी करुन स्वागत झाले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मायकल जॅक्सनचे स्वागत केले होते तर, अभिनेत्री सोनाली बेंद्रेने मायकलला ओवाळले होते. उद्योगपती अनिल अंबानी यांनी विमानतळावरुन मायकलला आणण्यासाठी त्यांची आलिशान गाडी दिली होती. मायकलचे हॉटेलमधील आगमनही एक भव्य सोहळा ठरला होता. तिथेही मायकलला एक झलक पाहण्यासाठी गर्दी होती. हॉटेलमधून निघताना मायकलने आपली आठवण म्हणून तिथे वापरलेल्या काही वस्तूंवर स्वाक्षरीही केली होती.