बेस्ट बचाव आराखडा समितीने फेटाळला
By admin | Published: June 3, 2017 06:47 AM2017-06-03T06:47:49+5:302017-06-03T06:47:49+5:30
महापालिकेकडून मदत मिळण्यासाठी आर्थिक संकटात असलेल्या बेस्टने तयार केलेला आराखडा बेस्ट समितीने फेटाळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेकडून मदत मिळण्यासाठी आर्थिक संकटात असलेल्या बेस्टने तयार केलेला आराखडा बेस्ट समितीने फेटाळला आहे. तिकिटांच्या दरात वाढ आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्या व सवलतीमध्ये कपात करण्याची या आराखड्यातील शिफारस सर्व सदस्यांनी धुडकावली. याउलट किमान बसभाडे आठ रूपयांवरून सहा रुपयांवर आणण्याची मागणी सदस्यांनी केली, तसेच दोनशे बसमार्ग बंद करणे आणि रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बस सेवा बंद ठेवण्यास सदस्यांनी नकार दिला. त्यामुळे बेस्टला वाचविण्याचे अन्य मार्ग सुचवणारा आराखडा प्रशासनाला नव्याने तयार करावा लागणार आहे.
बेस्टने महापालिकेकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, आर्थिक मदत हवी असल्यास बेस्टला वाचवणारा कृती आराखडा तयार करण्याची अट पालिका प्रशासनाने घातली. त्यानुसार, बेस्ट कामगारांच्या अनेक भत्त्यांमध्ये कपात, तसेच अनेक भत्ते गोठण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर तोट्यातील बस मार्ग बंद करणे, भाडे वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या आराखड्याचा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये मंजुरीसाठी प्रशासनाने आणला होता. बेस्ट चालवायची की बंद करायची आहे? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. तोट्यातून बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांकडूनही सूचना मागवण्याची व बेस्टचे कमी अंतराचे दर ६ रुपये करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी कर्मचाऱ्यांचे भत्ते पुन्हा नफ्यात आल्यावर सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, कृती आराखड्याच्या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने, तो नामंजूर करीत नव्याने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालकांनी घ्यावी जबाबदारी : महापालिका पालक संस्था असल्याने बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर आणण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पातच बेस्टचा अर्थसंकल्प समाविष्ट करावा, अशी सूचना सदस्यांनी केली.
युवराजांच्या स्वप्नाला सुरुंग
या आराखड्यात बेस्टच्या बसगाड्या रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत बंद ठेवण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, ही शिफारस म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ संकल्पनेलाच सुरुंग असल्याचा टोला भाजपा सदस्य सुनील गणाचार्य यांनी शिवसेनेला लगावला. रात्रीच्या या वेळेत बस बंद ठेवल्यास बेस्टला टाळे लावण्याची वेळ येईल, असा धोकाही त्यांनी दाखवून दिला.
अधिकाऱ्यांना सूट : या आराखड्यात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना मात्र यातून सूट मिळाली आहे. बेस्टला चालविणाऱ्या कामगारालाच निशाणा केल्यास बेस्ट बंद पडेल, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली. बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी भाडेवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात कपात अयोग्य असल्याचे मान्य केले. तरीही बेस्टला वाचविण्यासाठी आराखड्याला मंजुरी देण्याची विनंती त्यांनी केली. मात्र, त्यांच्या विनवणीकडे दुर्लक्ष करीत आराखडा फेटाळण्यात आला.