शिवराजसिंह चौहान यांचे उपोषण हा गांधी विचारांचा विजय - उद्धव ठाकरे

By admin | Published: June 12, 2017 07:53 AM2017-06-12T07:53:41+5:302017-06-12T07:53:41+5:30

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मोहनदास गांधी यांच्यावर टीका केली असली तरी त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते मात्र..

Shivraj Singh Chauhan's fast is the victory of Gandhi's thoughts - Uddhav Thackeray | शिवराजसिंह चौहान यांचे उपोषण हा गांधी विचारांचा विजय - उद्धव ठाकरे

शिवराजसिंह चौहान यांचे उपोषण हा गांधी विचारांचा विजय - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 12 - मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनाने जोर पकडताच गांधी विचारांची कास पकडून उपोषणाला बसलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना टोले लगावण्याची संधीही सोडलेली नाही. 
 
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर येताच रस्त्यावर उतरून सरकारविरोधी आंदोलन केले होते. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी सत्ता राज्य करण्यासाठी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मिळाली असल्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही तोच सल्ला आता लागू पडतोय का ? असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. 
 
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मोहनदास गांधी यांच्यावर टीका केली असली तरी त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते मात्र राज्यातील समस्या सोडविण्यासाठी गांधीगिरीचाच मार्ग स्वीकारीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य करायचे असते. शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या अनुभवी मुख्यमंत्र्याने आंदोलकांच्या विरोधात उपोषणाचा आत्मक्लेश करावा हा एक प्रकारे गांधी विचारांचाच विजय म्हणावा लागेल असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
संपूर्ण देशात शिवराजसिंह चौहान यांची राजवट आदर्श व आबादीआबाद करणारी असल्याचे चित्र रंगवले जात होते. शेतकरी, महिला, सामान्यजनांसाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवून जनतेला सदासुखी केल्याचे चित्र होते. तरीही मध्य प्रदेशचा शेतकरी रस्त्यावर उतरला व त्याने पाच बळी देऊन शिवराजसिंह सरकारला रक्ताचा टिळा लावला आहे अशा शब्दात शिवराजसिंह चौहान सरकारवर टीका करण्यात आली आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर येताच रस्त्यावर उतरून सरकारविरोधी आंदोलन केले होते. तेव्हा केजरीवाल यांच्या अशा बेशिस्त वर्तनाबद्दल टीका झाली होती आणि ती भारतीय जनता पक्षाने केली होती. सत्ता राज्य करण्यासाठी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मिळाली असल्याचा सल्ला तेव्हा त्यांना देण्यात आला. गांधीमार्गाची कास धरणारे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही तोच सल्ला आता लागू पडतोय का? गांधी विचाराने सगळ्यांचीच सोय होत असते. आधी बंदुकीच्या गोळ्या, मग उपोषण! हे राम!!
 
- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मोहनदास गांधी यांच्यावर टीका केली असली तरी त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते मात्र राज्यातील समस्या सोडविण्यासाठी गांधीगिरीचाच मार्ग स्वीकारीत आहेत. महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेशातही शेतकऱयांचे आंदोलन पेटले आहे व पोलीस गोळीबारात पाच गरीब शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला. दहा दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांनी थांबवावे आणि राज्यात शांतता नांदावी यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वतःच उपोषणाचे हत्यार उपसले. भोपाळच्या दशहरा मैदानावर त्यांनी आमरण उपोषण सुरू केल्याने ते टीकेचा विषय बनले आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य करायचे असते. शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या अनुभवी मुख्यमंत्र्याने आंदोलकांच्या विरोधात उपोषणाचा आत्मक्लेश करावा हा एक प्रकारे गांधी विचारांचाच विजय म्हणावा लागेल. पण गांधीजींनी, सरदार पटेलांनी अन्याय व जुलुमाविरोधात शेतकऱ्यांना लढण्यास तयार केले व सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून ब्रिटिशांसमोर आव्हान उभे केले. सरदार पटेल यांचा बारडोलीचा सत्याग्रह व गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह हेच सांगतो.
 
- गांधीजींचे उपोषण हे आपल्याच लोकांवरील अन्यायाविरोधात एक हत्यार होते. आज देशात ब्रिटिशांचे व काँग्रेसचेही राज्य नाही. काँग्रेस राजवटीत अन्याय होत असे तेव्हा ‘इंग्रजी गेले व काँग्रेजी आले’ असे आम्ही थट्टेने म्हणतच होतो. काँग्रेसपेक्षा इंग्रजांचे राज्य चांगले होते असेसुद्धा संतापाने म्हणायची वेळ अनेकदा आली. शेतकऱ्यांनी त्या इंग्रजी व काँग्रेजी राज्यास घालवले तरी शेतकऱ्यांवर गोळीबार सुरू आहे व गांधींप्रमाणेच मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री उपोषणाला बसले आहेत. संपूर्ण देशात शिवराजसिंह चौहान यांची राजवट आदर्श व आबादीआबाद करणारी असल्याचे चित्र रंगवले जात होते. शेतकरी, महिला, सामान्यजनांसाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवून जनतेला सदासुखी केल्याचे चित्र होते. तरीही मध्य प्रदेशचा शेतकरी रस्त्यावर उतरला व त्याने पाच बळी देऊन शिवराजसिंह सरकारला रक्ताचा टिळा लावला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने शिवराजसिंह दुःखात आहेत व उपोषणास बसले ही त्यांची संवेदना महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांप्रमाणे त्यांनी शेतकरी आंदोलनाची थट्टा केली नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन हे समाजकंटकांचे आंदोलन असल्याचे विधान करून त्यांनी घाणेरडे राजकारण केले नाही. 
 
- पाच शेतकऱ्यांचा मृत्यू हा त्यांच्यासाठी धक्का असावा व त्याच धक्क्यातून ते उपवासाला बसले असावे. शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी आपला उपवास सोडला. उपवास सोडताना त्यांनी त्यांच्या राजवटीत शेतकरी आणि जनहिताची किती कामे केली, आधीच्या सरकारांपेक्षा त्यांच्या राजवटीत कशी जास्त विकासकामे झाली याची उजळणी पुन्हा केली. ते सर्व ठीक असले तरी त्यांच्याच काळात शेतकरी रस्त्यावर उतरला, त्यातील पाच जणांचा पोलीस गोळीबारात बळी गेला आणि त्यामुळे त्यांनी दोन-तीन दिवसांचा का होईना उपवास करून आत्मक्लेश करण्याची वेळ आली हीदेखील वस्तुस्थितीच आहे. मागे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर येताच रस्त्यावर उतरून सरकारविरोधी आंदोलन केले होते. राजपथावर पथारी पसरून ते लोकांबरोबर झोपले होते. तेव्हा केजरीवाल यांच्या अशा बेशिस्त वर्तनाबद्दल टीका झाली होती आणि ती भारतीय जनता पक्षाने केली होती. सत्ता राज्य करण्यासाठी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मिळाली असल्याचा सल्ला तेव्हा त्यांना देण्यात आला. गांधीमार्गाची कास धरणारे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही तोच सल्ला आता लागू पडतोय का? गांधी विचाराने सगळ्यांचीच सोय होत असते. आधी बंदुकीच्या गोळ्या, मग उपोषण! हे राम!!

Web Title: Shivraj Singh Chauhan's fast is the victory of Gandhi's thoughts - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.