एसटीला थेट मिळणार तिकीट सवलतीची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:42 AM2017-07-24T05:42:57+5:302017-07-24T05:42:57+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) देण्यात येणाऱ्या सवलतीच्या तिकीट रकमेचा परतावा, आता थेट गृहविभागाकडून देण्यात येणार आ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) देण्यात येणाऱ्या सवलतीच्या तिकीट रकमेचा परतावा, आता थेट गृहविभागाकडून देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून तब्बल २४ घटकांना सवलतीच्या दरात तिकीट दिले जाते. ही रक्कम परत मिळण्यासाठी संबंधित खात्यांमधून विलंब होतो. त्यामुळे आता थेट गृहविभागाकडून सवलतीची १ हजार ३०० कोटींची रक्कम देण्यात येणार आहे.
तिकिटाच्या दरांतील सवलतीमध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वर्ग, अंध-अपंग व्यक्ती, कर्करोगग्रस्त विद्यार्थी, पुरस्कारप्राप्त खेळाडू, माजी आमदार अशा अन्य वर्गांचा समावेश आहे. परिणामी, अशा २४ वर्गांचा सामान्य प्रशासन विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, माहिती-जनसंपर्क विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अदिवासी विभाग, महिला व बालकल्याण विभाग अशा संबंधित विभागांचा समावेश आहे. संबंधित विभागांकडून परताव्याची रक्कम विलंंबाने मिळते. ही रक्कम वेळेवर मिळावी, यासाठी परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार, अनेक विभागांपेक्षा ही रक्कम थेट गृहविभागातून देण्यात येणार आहे. अशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
राज्यातील खेडोपाडी धावणाऱ्या एसटीच्या सेवेत विविध प्रवर्गासाठी सवलतीच्या दरात तिकीट आकारले जाते. त्या प्रवर्गातील सवलतीची रक्कम संबंधित खात्यामार्फत एसटी महामंडळाकडे जमा करण्यात येते. मात्र, ही रक्कम मिळण्यासाठी संबंधित खात्यांकडून अनेक अडचणी समोर येतात. त्यामुळे प्रत्यक्षात मात्र, ही रक्कम विलंबाने मिळते. योग्य वेळी रक्कम न मिळाल्याने एसटीचा आर्थिक डोलारा ढासळतो, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
जनसंपर्क विभागानेच दिली वेळेत रक्कम
शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागानेच सवलतीच्या दरातील रक्कम वेळेत एसटी महामंडळाकडे जमा केली आहे. राज्यातील पत्रकारांसाठी राज्यभर सवलतीच्या दरात आणि बहुतांशी ठिकाणी मोफत पास देण्यात येतो. त्यानुसार, देय असलेली रक्कम माहिती व जनसंपर्क विभागाकडून देण्यात येते. हा विभाग वगळता उर्वरित विभागाकडून रक्कम येण्यास विलंब होत असल्याची माहिती, नाव न छापण्याच्या अटीवर एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.